पान:वैय्यक्तिक व सामाजिक.pdf/१००

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे
८९
मार्क्सप्रणीत चातुर्वर्ण्य

हे कामगारांच्या ध्यानी आले, व मग हा वर्ग राष्ट्रीय स्वातंत्र्याच्या संग्रामात आघाडीवर येऊन इतर वर्गांच्या हेतूंचे स्वरूप स्पष्ट करू लागला.
 चिनी क्रांतीचे नेते माओ त्से तुंग, लिऊ शा ओ ची, चौ एन् लाय हे आपल्या भाषणात हाच सिद्धान्त मांडीत असतात. कामगारवर्ग ही चीनच्या क्रांतीची मूलशक्ति आहे. आमच्या क्रांतिसेनेचा तो अग्रदूत आहे. त्याच्या साह्यावाचून क्रांती यशस्वी होणार नाही. १९११ साली झालेली क्रांती अयशस्वी झाली याचे कारण हेच. त्या वेळी कामगारवर्गाने त्या लढ्यात जाणिवेने भाग घेतला नव्हता. पुढे यश येत गेले ते कामगारांच्या व कम्युनिस्ट पार्टीच्या नेतृत्वामुळेच होय इ. विचार नेहमी आपल्याला चीनमधून आजही ऐकू येतात.
 माझ्या मते कामगारांची ही स्तुतिस्तोत्रे अंती त्यांच्याच नाशाला कारणीभूत होतील. आज चीन- रशियामध्ये तशी झालीच आहेत. तुम्ही नेते, तुमची सत्ता, तुमचे राज्य अशी कामगारांची स्तोत्रे गाऊन या देशातील सत्ताधाऱ्यांनी कामगारांना गुलामापेक्षाहि खालच्या अवस्थेला नेऊन सोडले आहे. पूर्वी याच देशात असलेले संपाचे, संघटनेचे, नोकरी सोडण्याचे, कसलेही स्वातंत्र्य आता कामगारांना तेथे नाही. तशी त्यांनी जरा चळवळ केली तर त्यांना सैबेरियातील कोंडवाड्यात इहलोकीचा नरक भोगावा लागतो. भांडवलदारांच्या विरुद्ध चिथावणी देण्यासाठी म्हणूनच केवळ अशी कामगारांची अमर्याद स्तुती मार्क्सवादी लोकांनी केली असती तर ते एकवेळ क्षम्य झाले असते. पण शेतकरी व कामगार यांच्यासंबंधी तुलना करताना मार्क्सवादी हीच वृत्ती ठेवतात. क्रान्तीसाठी शेतकऱ्यांचे साह्य कामगारांना हवे पण राजसत्ता ही कामगारांच्या हातीच राहिली पाहिजे. शेतकरी हा कामगाराच्या अधिकाराखालीच राहिला पाहिजे असा लेनिनचा दण्डक होता. (लेनिन, सिलेक्टेड वर्क्स, खंड २ रा- पृ. ८५३. फॉरिन लँग्वेज पब्लिशिंग हौस, मॉस्को) [या लेखात फॉरिन लँग्वेज पब्लिशिंग हौस, मॉस्को या संस्थेने प्रकाशित केलेल्या (१) मार्क्स-एंगल्स- सिलेक्टेड वर्क्स, खंड पहिला (२) खंड २ रा (३) लेनिन- थर्ड इंग्लिश एडिशन आणि (४) लेनिन- सिलेक्टेड वर्क्स, खंड २ रा- या चार ग्रंथांतून मी उतारे देणार आहे. एवढाली नावे पुन्हा देणे त्रासाचे असल्यामुळे दर वेळी कंसातल्या आकड्यांचा फक्त निर्देश केलेला आहे.] यामुळे कामगारवर्गाची अपरिमित हानी झाली आहे. बुद्धिजीवी