पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/5

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्यांत जें मूळ संस्कृताचे भाषांतरं दिलेले आहे ते, कोशं व व्याकरण यांच्या दृष्टीने, अत्यंत निर्दोष आहे किंवा नाहीं; तर मुख्य प्रश्न असा की, ज्या तत्त्वमीमांसाविषयक गोष्टीं संबंधाने शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या मध्ये सर्वथैव मतैक्य आहे, असे त्या विवेचनांत निर्दिष्ट केलेले आहे, तेवढ्या गोष्टीं संबंधाने त्यांच्या मध्ये सर्वथैव मतैक्य आहे किंवा नाहीं. ज्यांना हा विषय गम्य असून ज्यांनी शंकराचार्य व रामानुजाचार्य यांच्या ग्रंथांचे प्रत्यक्ष रीतीने अध्ययन केलेले असेल, अशा कोणी वरील प्रश्नाच्या दृष्टीने पुढील विवेचन वाचून त्या संबंधानें आपलें मत कळविण्याची तसदी घेतली, तर हा निबंधकार त्यांचा फार आभारी होईल. होळकर कॉलेज, इंदूर, अक्टोबर, १९०९ शांताराम अनंत देसाई