पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/152

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

१४८ वैदिक तत्त्वमीमांसा अनुभवांचा किंवा ज्ञानांचा प्रवाह. उदाहरणार्थ, ज्या घटाकार ज्ञानाच्या योगाने कपालाकार ज्ञान उत्पन्न होते, ते पूर्वघटज्ञान; ते पूर्वीचे घटज्ञान त्याच्या पूर्वीच्या घटज्ञानाने उत्पन्न झालेले असते. या प्रमाणे हा जो निरनिराळ्या ज्ञानांचा प्रवाह त्याला वासना ह्मणतात. जर कोणी असे विचारील कीं, मोहरी, पर्वत, इत्यादि बाह्य पदार्थांचे जे आकार ते अंतस्थ जीं ज्ञाने त्या ज्ञानांचेच आकार असे कसें ह्मणतां येईल ? तर या प्रश्नाला उत्तर असे. बाह्य पदार्थ विद्यमान आहेत असे जरी गृहीत धरिलें, तरी त्यांच्या विषयांच्या ज्ञानां मुळेच ते व्यवहाराला योग्य होतात. कारण जर तसे नसते, तर एकानें जाणिलेला कोणताही पदार्थ व दुस-याने जाणिलेला पदार्थ यांच्या मध्ये कांहीं फरक झाला नसता. आणि आपणांला ज्या ज्ञानांचा अनुभव येतो, ती ज्ञानें आकारयुक्त असतात असे मानले पाहिजे. कारण जर ती आकारयुक्त नसती तर त्यांचा अनुभव येतो तो येणे शक्य झाले नसते. आतां ज्या अर्थी आपणांला एकाच आकाराचा अनुभव येतो, त्या अर्थी तो आकार ज्ञानाचाच असला पाहिजे. अर्थात् , तो आकार बाह्य वस्तूचा आहे असे जे आपणांला वाटते ते भ्रममूलक होय. तसेच, कोणतेही ज्ञान व त्या ज्ञानाचा विषय यांच्या विषयीं नेहमी आपणांला एकाच वेळीं अनुभव येतो. त्या मुळे देखील असेच मानिले पाहिजे की, कोणत्याही ज्ञानाचा विषय त्या ज्ञानहून भिन्न नव्हे. पुनः, बाह्य पदार्थ विद्यमान आहेत असे जे प्रतिपादन करतात, त्यांनी देखील असें कबूल केलेंच पाहिजे की, बाह्य पदार्थांच्या निरनिराळ्या आकारां सारखेच ज्ञानांचे निरनिराळे आकार असतात. कारण घटः