पान:वैदिक तत्वमीमांसा.pdf/100

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले नाही

९६ वैदिक तत्त्वमीमांसा

हेच एक साधन आहे, दुस-या कोणत्याही साधनाने ते ज्ञान प्राप्त होणे शक्य नाही. परंतु जरी ते हा सिद्धांत प्रतिपादन करितात, तरी ते असे ह्मणत नाहीत कीं, तत्त्वज्ञान मिळविण्या संबंधाने अनुमानादि विचारशक्तीचा कांहींच उपयोग नाहीं. (१) कारण, एकतर, जर कोणी केवळ अनुमानादि प्रमाणांच्याच साहाय्याने तत्वज्ञानविषयक सिद्धांत सिद्ध करून दाखवील, तर त्या विषयी त्यांची कांहीं हरकत नाही इतकेच नव्हे, तर केवळ अनुमानादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणारे जे तत्वज्ञानविषयक सिद्धांत, त्यांचा जो भाग श्रुती मध्ये प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानविषयक सिद्धांतांशीं संमत असेल किंवा असंमत नसेल त्याचे ग्रहण करावे, असे त्यांनी स्पष्ट प्रतिपादन केले आहे. (२) दुसरे असे की, श्रुतिग्रंथांमध्ये उपलब्ध जें तत्त्वज्ञानविषयक मत, तेच मत सत्य असे प्रतिपादन करण्या करिता, त्या मता विरुद्ध अशी जी तत्त्वज्ञानविषयक मते त्यांना माहीत होती, त्या मतांचे शंकराचार्य व रामानुजाचार्य यांनी खंडन केले आहे. परंतु त्यांनी जे त्या मतांचे खंडन केले आहे ते, त्या पैकी प्रत्येक मत श्रुती मध्ये प्रतिपादन केलेल्या तत्त्वज्ञानविषयक सिद्धांतांशी विरुद्ध आहे, एवढेच दाखवून केलें नाहीं; तर ते अनुमानादि प्रमाणांच्या योगाने सिद्ध होणा-या गोष्टींच्या विरुद्ध आहे, असे अनुमानादि प्रमाणांच्याच साहाय्याने दाखवून, त्यांनी त्या मतांचे खंडन केले आहे, (१) वरील पृष्ठ ९१-९४ पहा.