पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/98

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

तुरुंगाचा ‘तिहार आश्रम' करण्याच्या किमयेची कहाणी. ‘मजल दरमजल' ही सतत पुढच्या पावलांची छाप आपणावर टाकते. पण 'व्हॉट वेंट राँग?' मात्र आपणास अंतर्मुख होण्यास भाग पाडते. बलात्कारित, अत्याचारित, व्यसनाधीन कायद्याचे तांत्रिक बळी, निष्पाप, रमी असणे, सुंदर असण्याचा शाप भोगणाच्या भगिनी, युनियनच्या राजकारणाचे बळी ठरलेले कामगार, पोलीस खाक्याचे बळी वाचले की वाचकांच्या मुठी आपोआप वळू लागतात. या कहाण्यांतील व्यथा तुमच्या संवेदनशील मनास साद घालत पाझर फोडतात. प्रत्येक आत्मकथनाच्या शेवटी डॉ.किरण बेदी यांनी 'कुठे चुकलं?' अशी चौकट टाकली आहे. चौकटीत घटनांचे निष्कर्ष आहेत. ते विचारप्रवण होत. ते नेमके करणे आवश्यक होते. प्रत्येक कहाणीत चूक कोणाची याचा न्याय होता. तर या कहाण्या नेमक्या होत्या; पण ती कठीण गोष्ट आहे खरी. 'नवज्योत', ‘इंडिया व्हिजन', ‘फॅमिली व्हिजन'कडे समुपदेशनासाठी (काऊंसिलींग) आलेल्यांना त्यांच्याच शब्दात त्याचे जीवन लिहिण्यास प्रेरित करण्याचे मोठे काम किरण बेदी यांनी केले आहे. त्यामुळे 'व्हॉट वेंट राँग?' च्या माध्यमातून सामाजिक अत्याचारांचा एक विशाल पटल आपणापुढे उभा राहतो. ज्यांना सुखासीन जीवन लाभले त्यांना या आत्मकथा अतिशयोक्त वाटण्याचा संभव. परंतु ज्यांनी तुरुंग, रिमांड होम, स्त्री आधार केंद्र, व्यसनमुक्ती केंद्र पाहिली, अनुभवली असतील त्यांना अजून वास्तव दूरच वाटल्याशिवाय राहणार नाही.

 'व्हॉट वेंट राँग?' टाइम्स ऑफ इंडियामध्ये प्रकाशित स्तंभलेखन. नवभारत टाइम्स'मध्ये त्यांचा हिंदी अनुवादही येत राहायचा. लीना सोहनी यांनी त्याचा उत्कृष्ट मराठी अनुवाद पुस्तकरूपात सादर केला आहे. मेहता पब्लिशिंग हाऊसने इंग्रजी ग्रंथांच्या मराठी अनुवादाची जी चळवळ सुरू केली आहे त्यातले हे पुढचे पाऊल, या ग्रंथाचे जे साहित्यिक मूल्य आहे त्यापेक्षा मला त्याचे सामाजिक मोल अधिक महत्त्वाचे वाटते. ते अशासाठी की, या ग्रंथात बधिर समाजमनास संवेदन, सक्रिय करण्याची प्रचंड ताकद आहे. हा सामूहिक आत्मकथनपर ग्रंथ सामाजिक अत्याचारांचे अनेक नमुने वाचकांपुढे पेश करतो. लक्षात येते की, किती प्रकारचे अत्याचार असतात समाजात. निरपराधांना अभय देण्यासाठी ‘खल निग्रहणाय' ब्रीद धारण करणारी पोलीस यंत्रणा किती कुचकामी, पक्षपाती, भ्रष्ट आहे. आशावादी उदाहरण अपवाद. समाजाच्यालेखी तुरुंगात जाऊन आलेला, रिमांड होममध्ये असणारा, पोलिसांनी अटक केलेला तो गुन्हेगार हे अविचारी समाजमन भावसाक्षर, निरक्षर, न्यायविवेकी केव्हा होणार? व्यवस्थेविरुद्ध लढणा-यांच्या बाजूने आपण असंघटित होणार की नाही? निरपराधांना सामाजिक अभय केव्हा मिळणार? न्यायातील दिरंगाई

वेचलेली फुले/९७