Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/86

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 राहावा म्हणून विचारांचा भुंगा घोंघावत ठेवते. अनुकरणाच्या पातळीवर वाचकास सक्रिय करण्याच्या कसोटीवर हे आत्मकथन अपारंपरिक नि म्हणून महत्त्वाचे ठरते. माणसाचे जीवन केवळ वद्य पक्षाने भरलेले नसतेच मुळी. कृष्ण पक्षाच्या झालरीशिवाय वद्याची रंगत ती कुठली? प्राचार्य सातवेकर ‘घडण' मध्ये कटू प्रसंग नोंदवतात. त्यात त्यांची शालीनता आढळते. ते खेड्यात राहूनच त्यांनी खेड्यातील मुलांसाठी अध्यापन केले. शिक्षण महाविद्यालयात सेवेची संधी मिळाली. शिक्षकांच्या नव्या पिढीची घडण करणारा हा शिल्पकार! आपल्या विद्यार्थ्यांच्या घडणीत खोट राहू नये म्हणून त्यांची धडपण असायची. ती अधिक भावते ती धडपडीतल्या भाबडेपणामुळे. प्राचार्य सातवेकरांची घडण नि जीवन म्हणजे अखंड भाबडेपण.

 ‘घडण' प्राचार्य सातवेकरांच्या जीवन, व्यक्तिमत्त्व नि कार्याचा आलेख रेखाटणारे व्यक्तिगत लेखन. आठवणी सांगत त्यांनी वाचकांशी सहज संवाद साधलाय. गतकाळचे सिंहावलोकन करताना त्यांचे मन दाटून येणे स्वाभाविक म्हणायला हवे. ‘घडण'मध्ये आंतरिक जिव्हाळा आहे. मांडणीतही साधेपणा आहे. अकारण कलात्मक, ललित करण्याच्या हव्यासापासून लेखक दूर राहिल्याने या आत्मकथेस सहजतेतले सौंदर्य लाभलंय. ते स्वान्तः सुखाय आहे. परहिताची ओढ ही या लेखनामागे स्पष्ट आहे. लोकशिक्षणाची बैठक लाभलेले हे आत्मकथन एका ऋजू व्यक्तीची निर्व्याज अभिव्यक्ती होय.


• ‘घडण' (आत्मकथन)

 लेखक - प्राचार्य अरविंद सातवेकर
 प्रथमावृत्ती - मार्च २००१
 प्रकाशक- महाराष्ट्र ग्रंथ भांडार, कोल्हापूर.

 पृष्ठे १६0 किंमत १00 रुपये.

♦♦

वेचलेली फुले/८५