Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/85

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘घडण' : सामान्याच्या धडपडीचे आत्मचरित्र


 ‘घडण' प्राचार्य अरविंद सातवेकरांचे आत्मचरित्र आहे. एक सुताराचे पोर. घरची गरिबी, अशिक्षित आई-वडील. गावही निरक्षर, पोर सातवी पास होते, याचं साऱ्या गावाला अप्रूप. म्हणून मुलाला बोर्डिंगात शहरात शिकायला ठेवले जाते. हायस्कूल, कॉलेज करीत मूळचा तुकाराम सुतार पदवीधर होता. एका कथेच्या लेखक रूपाने अरविंद सातवेकर असे टोपण नाव धारण करतो. हे केवळ नामांतर नसते. असतो तो कायाकल्प व्यक्मित्त्वाचा, जीवनाचा. पुढे ते पदवीधर होऊन डी. बी. एड्. होतात. गारगोटीच्या मौनी विद्यापीठात प्राध्यापक नि पुढे प्राचार्य होऊन निवृत्त. 'घडण आत्मचरित्राचे हे संक्षिप्त कथानक. यात तुम्हास एका सामान्याचा असामान्य जीवन संघर्ष वाचावयास मिळतो.

 माणूस मोठा कसा होतो हे ज्यांना समजून घ्यायचे असेल त्यांनी ‘घडण' वाचायलाच हवे. ‘घडण'च्या लेखनाची बैठकच मुळी संस्कारपीठाची आहे. आत्मकथा हे व्यक्तीच्या गतजीवनाचे केवळ सिंहावलोकन असत नाही, तर ते भविष्यात दिग्दर्शनही असते. ‘घडण'मध्ये ती शक्ती आहे. अंतर्बाह्य सोज्वळ कथनाची शैली लाभलेले हे आत्मकथन लोभस वाटते. ते त्यातील पानागणिक भरलेल्या कृतज्ञता वृत्तीमुळे. माझी घडण अशी झाली, यांनी ती केली, असं प्राचार्य सातवेकर जेव्हा घडणद्वारे सांगत राहतात, तेव्हा ते आई-वडील डॉ. जे. पी. नाईक, डॉ. डी. वाय. पाटील यांचे ऋण आवर्जून नोंद करतात.

 घडण हे उरबडवे आत्मकथन नाही. या घडणीत आपण प्राचार्य सातवेकरांचे उत्तरायुष्य वाचतो, तेव्हा त्यात ऋणाईताच्या भावनेने केलेली विधायक परतफेडही लक्षात येते. कोल्हापूर महानगरपालिकेत जे. पी. नाईकांचे तैलचित्र लावणे, आपल्या पगारातील काही वाटा सतत कष्टकरी, गरीब विद्यार्थ्यांना देणे, या गोष्टी साधेपणातून एका मोठ्या अनुकरणाची पायवाट निर्माण करतात. ‘घडण' आत्मकथेचे साहित्यिक मूल्य समीक्षक करतीलच. मला या आत्मकथेचं सामाजिक मोल अधिक वाटते. बरीच आत्मकथने लोक वाचताक्षणी विसरतात. ‘घडण'ची कथा तुमच्या मनाकानात सतत सक्रिय कृतज्ञतेचा वसा जिवंत

वेचलेली फुले/८४