Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/82

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

‘चाकाची खुर्ची' : अपंग समाजसेविकेचे आत्मकथन


महाराष्ट्रास समाजसेवेची दीर्घ परंपरा आहे. महाराष्ट्रातील कल्याणकारी कार्यामागे ख्रिश्चन मिशनरींची प्रेरणा आहे. येथील पहिले संस्थात्मक कार्य मिशनच्यांनी सुरू केले. अनाथ, अंध, अपंग, मतिमंद, मूक, बधिर, बालगुन्हेगार, महिला, परित्यक्ता सर्वांच्या कल्याणकारी संस्थांमागील प्रेरणा पाहताना हे स्पष्ट होते. महात्मा फुले यांनी सुरू केलेल्या ‘बालहत्या प्रतिबंधकगृहापूर्वी (१८६३) महाराष्ट्रात सुरू झालेली पहिली कल्याणकारी संस्था डेव्हिड रिफॉर्मेटरी स्कूल, माटुंगा, मुंबई (१८५७) ब्रिटिशांनीच सुरू केली होती. नंतर प्रार्थनासमाज, पंडिता रमाबाई, महर्षी धोंडो केशव कर्वे, कर्नल लॉईड, कानजी द्वारकादास, मिस. एस. के. डेव्हिस यांच्यापासून प्रेरणा घेऊन स्वातंत्र्योत्तर काळात सर्वश्री गोदावरी परूळेकर, ताराबाई मोडक, अनुताई वाघ, इंदिराबाई हळबे, सिंधुताई जोशी, अंबुताई मेहेंदळे, कुमुदताई रेगे, प्रभृती भगिनींनी आदिवासी कल्याण, बालशिक्षण, अनाथांचे संगोपन, मतिमंदांचे शिक्षण, पुनर्वसन, परित्यक्ता कल्याण अशा क्षेत्रात कार्य करून त्या संस्थांच्या कार्याशी आपले अभिन्न नाते जोडले. गेल्या शतकाच्या अखेरच्या कालखंडात (आणीबाणीनंतर) नसीमा हरजूक यांनी अस्थिव्यंगांच्या पुनर्वसन क्षेत्रात केलेले कार्य उपरोक्त परंपरा वृद्धिंगत करणारे आहे, हे त्यांचे आत्मकथन ‘चाकाची खुर्ची' वाचताना लक्षात आल्यावाचून राहात नाही. सारे जग सत्तेची संगीत खुर्ची खेळण्यात दंग झालेले असताना सेवेच्या खुर्चीवर खिळून राहणे ही साधी गोष्ट नाही. सामान्यांना त्यांच्या धडधाकट शरीराने जो पराक्रम करता आला नाही, तो नसीमा हुरजूक यांनी आपल्या संस्था व कार्य सहकार्याच्या सहयोगातून करून दाखवला. त्याचा चढता आलेख 'चाकाच्या खुर्चीची पाने चाळत आपण जसे पुढे जाऊ तसा डोळ्यांपुढे मूर्त होतो. सामाजिक प्रबोधनाच्या हेतूने लिहिलेली आत्मचरित्रे मराठीत विपुल आहेत. धोंडो केशव कर्व्यांचे ‘आत्मवृत्त' (१९१५) श्री. म. माट्यांचे ‘मी व मला दिसलेले जग' (१९५७), पार्वतीबाई आठवल्यांची ‘माझी कहाणी' (१९२८), लक्ष्मीबाई टिळकांची ‘स्मृतिचित्रे' (१९३४-३६) ही सहज आठवणारी नावे. तशीच आत्मकथनेही विपुल आहेत.

वेचलेली फुले/८१