परीक्षण राजकारणाच्या अवकाशातील स्त्री प्रतिमेचा नि प्रतिभेचा शोध ठरावा. स्त्री आपले ‘बाहुलीपण' नाकारून 'स्वतंत्र माणूस' म्हणून जगण्याचा प्रयत्न करते, तेव्हा पुरुष सर्व शक्तीनिशी नि सर्व मार्गांनी (साम, दाम, दंड, भेद) ती आपल्या हातातले ‘खेळणे कसे आहे, हे दाखविण्याचे सतत उद्दाम प्रदर्शन कसे करतो, याचे मार्मिक प्रत्यंतर हा लेख देतो. महाभारतातील ‘कण्वनीती असो वा ‘वर्तमानातील स्त्री आरक्षण नीती' दोन्ही मूल्यशून्यतेच्याच निदर्शक! स्त्री भावनेचे खच्चीकरण करणाऱ्या पुरुषी अहंकाराचा दर्प ठेवण्याची ऊर्मी जागवणारा हा लेख स्त्रीवादी समीक्षेतील स्फुलिंग दाखवतो.
'तेरूओ’ आणि ‘काही दूरपर्यंत' हा गौरी देशपांडेच्या लघु कादंब-यांची चिकित्सा करणारा लेख या ग्रंथातील सर्वाधिक महत्त्वाचा व विचारगर्भलेख होय. स्त्री-पुरुष संबंध हा दोन्ही कादंबरींचा समान विषय. पण त्यातून घेतलेला वैश्विकतेचा शोध मात्र अनाकलनीय! विवाहबाह्य संबंध लेख इतिहासाच्या अंगाने व मार्गाने घेतलेला स्त्रीच्या तिस-या बिंदूचा शोध होय. यात समीक्षिकेने इतिहासाच्या तटस्थतेचे पालन केल्याने ते अधिक न्यायसंगत व न्यायसंमत सिद्ध झाले आहेत. आजवरचे पुरुषसापेक्ष जीवन विधायकतेपेक्षा विनाशांचा अनुभव देणारे. यावर विधायक उतारा म्हणजे प्रेम. तो उतारा स्त्रीच देऊ शकते, हा डॉ. तारा भवाळकरांचा ठाम विश्वास ; पण त्यासाठी कोणताही आधार देत नाहीत. त्यामुळे तो एकांगी वाटला नाही तरच नवल!
‘अंतरांजली यात्रा' व अग्निस्नान' हे दोन प्रायोगिक चित्रपट डॉ. भवाळकर दूरदर्शनवर पाहतात नि प्रतिक्रिया म्हणून लेख लिहितात. त्यात परीक्षणाचा भाव नाही. कथालेखक, दिग्दर्शक, अभिनेता, अभिनेत्री, संगीतकार अशा तपशिलांना फाटा देऊन केवळ कथेच्या अंगाने घडणा-या स्त्री प्रतिमेचा शोध घेतात. या लेखनात सहज केलेल्या प्रवासातील अनुभवसंपन्नता जशी आहे, तसे अभिव्यक्तीतले लालित्यही! दरदर्शनवरून दाखविले जाणारे प्रादेशिक भाषांतील चित्रपट अभिरुचीसंपन्न नि म्हणून अभिजात असतात. ही या लेखाची रुजवण कला नि साहित्य संस्काराच्या दृष्टीने लाखमोलाची वाटते. 'अंतरांजली यात्रा' तील ‘डोंब' पुरुष पात्र असूनही मनात माणुसकीचा तो डोंब उसळवतो तो वाचक कधीच विसरू शकणार नाही.
पूर्वप्रकाशित या लेखांचा संग्रह एकत्रितरित्या वाचताना विचारांची संगती लावणे जसे सोपे जाते, तसे निष्कर्षाप्रत पोचणेही सुलभ होते. आकर्षक मुखपृष्ठ सोलापूरच्या पोरे बंधूचे आहे. डॉ. तारा भवाळकरांच्या लेखनास लोकसाहित्याच्या व्यासंगाचे अधिष्ठान आहे. संशोधनाची शिस्त आहे. त्यामुळे