पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/79

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

अद्याप तरी हाती आलेला नाही. हे लेखन त्या दृष्टीने केलेली धडपड मात्र खचितच आहे. डॉ. तारा भवाळकर यांनी आपल्या चिकित्सेतून काढलेला स्त्री लेखनाचा हा निष्कर्ष स्त्रीवादी अंगाने लेखन करणा-या सर्वांना विचार करायला लावणारा आहे. हेच या ग्रंथाचे मोठे यश आहे.

 डॉ. तारा भवाळकर यांनी ग्रंथातील स्त्री आत्मकथनाचे सार’ लेखात पार्वतीबाई आठवलेंच्या 'माझी कहाणी' पासून ते अलीकडच्या मेधा किराणेंच्या ‘नरसाबाई' पर्यंतच्या मराठी स्त्री आत्मकथनांची चिकित्सा केली आहे. ते करताना त्या ठळक व बहुचर्चित स्त्री आत्मकथनांचाच विचार करतात. ‘स्मृतीचित्रे', 'मला उद्ध्वस्त व्हायचंय', 'नाच गं घुमा', 'आहे मनोहर तरी', ‘बंध अनुबंध' ची विस्ताराने चर्चा आहे. माझ्या जल्माची चित्तरकथा', 'जिणं आमुचं', ‘अंत:स्फोट’, ‘बिनपटाची चौकट'चे उल्लेख आहेत. मराठी स्त्री आत्मकथनात खरे तर उच्चभ्रू, मध्यमवर्गीय स्त्री लेखकांपेक्षा उपेक्षित नि सामान्य स्त्रियांनी जे लेखन केले, त्यात खरे तर तिसरा बिंदू ठळक दिसतो. डॉ. तारा भवाळकर यांनी ‘नाच गं घुमा', ‘आहे मनोहर तरी', नि ‘बंध अनुबंध' या आत्मकथनांच्या चिकित्सेत जी तटस्थता नि परखडपणा दाखवला आहे, त्याची दाद द्यायला हवी. त्यांना हे लेखन मुखवटा घेऊन केलेले दिसते. शिवाय ते सारे लौकिकांच्या डोळे दिपवणाच्या यशाचे पुरुषी व्यवस्था नाकारणारे, पती 'मित्र' नव्हता अशी खंत व्यक्त करणारे ‘गृहिणीच्या परीघातले वाटते, आणि ते खरेही आहे.

 या लेखाला जोडूनच ‘पडद्यामागचं घर' मध्ये ताराताईंनी 'मी दुर्गा खोटे', ‘चंदेरी दुनियेत', 'कशाला उद्याची बात', 'सांगत्ये ऐका', ‘जाऊ मी सिनेमात?', ‘स्नेहांकित', ‘अशी मी जयश्री', ‘जगले जशी’, ‘माझी नृत्यसाधना' सारख्या स्त्री आत्मकथनांची केलेली चिकित्सा अधिक भावते. तिसरा बिंदू इथे अधिक प्रकर्षाने हाती येतो तो अभिनेत्री लेखकांनी 'घर' नि 'मी' च्या शोधात केलेल्या खऱ्या संघर्षामुळे. या सगळ्या आत्मकथांचे स्वत:चे एक सूत्र आहे. अभिनेत्रींच्या वाट्याला आलेले भोग पुरुषी अत्याचाराचे खरे; पण यात स्त्रीची स्वत:ची काही भूमिका/भागीदारी असते का, यांचा विचार आत्मकथनात होत नाही व चिकित्सेतही. नीरक्षीर न्यायाचे मूल्यमापन विशिष्ट वाद दृष्टीने केलेल्या लेखनात दिसणे दुरापास्त असते. ते इथेही, पण डॉ. तारा भवाळकर यांनी या लेखात चित्रपटासारख्या कला क्षेत्रातील स्त्री जोखीम नव्या पिढीसाठी गांभीर्याने नोंदली आहे.

 श्रीनिवास जोशींच्या ‘आमदार सौभाग्यवती' नाटकाच्या निमित्ताने केलेले

वेचलेली फुले/७८