पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/59

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

बालभाग्यविधात्री डॉ. मादाम मारिया माँटेसोरी चरित्र


 बाल शिक्षणतज्ज्ञ डॉ. मादाम मारिया माँटेसरी यांचे सविस्तर चरित्र मराठीत अपवादानेच लिहिले गेले आहे. अलीकडच्या काळात शिक्षणाचा घाऊक प्रसार सुरू झाला असला तरी या प्रसारात शिक्षणापेक्षा व्यापार, व्यवहार, मिळकत या मूल्यांना महत्त्व आले असल्याने बालवाड्यांची संख्या वाढूनही बालवाड्या समृद्ध कशा होतील, तेथील शिक्षण माँटेसरीच्या मूळ कल्पनेबरहुकूम कसे होईल, याची चिंता नि चिंतन करणारे लोक विरळाच. रा. वा. शेवडे गुरुजी त्यातील एक होते. ते स्वतः डॉ. माँटेसोरींचे शिष्य, बाल शिक्षणाचा मंत्र त्यांनी माँटेसोरींच्याकडून घेतला व जीवनभर ते तो जपत राहिले. अलीकडे बालवाडी शिक्षिकांना प्रशिक्षित करण्याचे एक चांगले आंदोलन सर्व महाराष्ट्रात पसरते आहे. अनुताई वाघ, निर्मलाताई पुरंदरे, लीलाताई पाटील, रा. वा. शेवडे गुरुजी या मंडळींनी या आंदोलनाची पताका आपल्या खांद्यावर घेतली नि सतत फडकत ठेवली. बालवाडी शिक्षकांना मार्गदर्शन व्हावे म्हणून शेवडे गुरुजींनी हे चरित्र लिहिले आहे.
 बालवाडी शिक्षिकांचे अल्प शिक्षण व प्रशिक्षणानंतर ज्यांना शिकायचे तो बालवर्ग अशा दोघांचे मान ठेवून गुरुजींनी या चरित्राची शेती उद्बोधक, संवादात्मक ठेवली आहे. माँटेसोरीच्या जीवनातील निवडक प्रसंगाचे चित्रण करून त्यांच्यातील शिक्षिकेचे व्यक्तिमत्त्व ठळकपणे चित्रित करण्यास लेखकास असाधारण यश मिळाले आहे.

 शेवडे गुरुजींचे हे नव्वदावे पुस्तक. त्यांच्या अमृतमहोत्सवी वर्षी ते प्रकाशित झाले असल्याचे औचित्य साधून प्रकाशकाने ते अंतर्बाह्य सुंदर केले आहे. बहुरंगी मुखपृष्ठ, जागोजागी रेखाटने, ठळक छपाई यामुळे हे पुस्तक शिक्षकांइतकेच बालकुमारांनाही आवडेल यात शंका नाही. या चरित्र ग्रंथांच्या शेवटी परिशिष्ट स्वरूपात शेवडे गुरुजींनी माँटेसोरीच्या सहवासातील आठवणी शब्दबद्ध करून हे चरित्र अधिक जिवंत व वस्तुनिष्ठ बनविले आहे. बालवाडी शिक्षक प्रशिक्षण पाठ्यक्रमात या पुस्तकांचा समावेश व्हायला हवा. प्रशिक्षित

वेचलेली फुले/५८