जस्मिन : सैनिकी जीवनाधारित प्रेम कादंबरी
एच. ई. बेट्सच्या ‘ट्रिपल एको' या गाजलेल्या कादंबरीने प्रभावित होऊन लिहिलेली अश्विनी धोंगडे यांची ‘जस्मिन' ही कादंबरी. एका मुलखावेगळ्या जगात जीवन कंठणाच्या परात्मभावी स्त्रीची एक हलकीफुलकी कथा होय.
ही कादंबरी एका बैठकीत संपविता येण्याइतकी लघुकाय असल्याने व पात्र नि प्रसंग ही दोन-तीनच असल्याने खरे तर तिला दीर्घकथा म्हणणेच अधिक सयुक्तिक ठरेल.
जस्मिनचा नवरा चीनमध्ये कैदेत आहे. त्याच्या सुटकेची आता कसलीच आशा नाही. अशा स्थितीत जस्मिन सीमेलगतच्या आपल्या शेतातील छोट्या घरकुलात एकाकी दिवस काढत असते. घरात असलेल्या बंदुकीच्या आधारे ती आपल्या या सीमित राज्यात कोणासही येऊ देत नसे. सीमा सुरक्षा दलातील जसवंत नावाच्या एका सैनिकाच्या ती सान्निध्यात येते. दीर्घकालच्या पती विरहाने व सैन्यातील एकाकीपणाने दोघे एकमेकांकडे आकर्षित होतात. जस्मिनच्या सहवासामुळे जसवंतला सैनिकी जीवनाचा उबग येतो. तो सैन्यातून पळून येतो. वेश पालटून जस्मिनची बहीण रोशन म्हणून राहू लागतो. सेनादलातील लोक पाळत ठेवून जसवंतला पकडतात. त्याला पकडून चौकशीसाठी परत आणत असतानाच ती सार्जंटवर गोळी झाडते. त्यात दोघेही मृत्युमुखी पडतात. परत ती एकाकी होते.
बर्फाळ प्रदेशाच्या निसर्गसमृद्ध पार्श्वभूमीवर उभारलेली ही कथा सौंदर्य विवरणाने अधिक काव्यात्मक करणे शक्य असतानाही लेखिकेने त्याकडे दुर्लक्ष केले आहे. कथेस प्रणयलीलेत डुबवण्याबाबत ती अधिक दक्ष असल्याने सैनिकास स्त्री रूप देण्याची अवास्तवताही ती निर्माण करते. कथानक आणि ते रंगविण्याची पद्धत लक्षात घेता तरुण वाचकाला रिझविण्याच्या माफक उद्देशानेच ती लिहिली असावी असे वाटते.
___________________________________________________________________________________________________________________________________________________
• जस्मिन (कादंबरी)
लेखिका - अश्विनी धोंगडे
प्रकाशन - दिलीपराज, प्रकाशन पुणे
प्रकाशन वर्ष - १९८१
पृष्ठे - ९२ किंमत - १४ रु.
वेचलेली फुले/२१
पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/22
Appearance
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे