पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/211

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

कुतूहलाचा विषय ठरतो हे या ग्रंथाचे आगळेपण होय. संपर्क साधनांचे भलेबुरे परिणाम दिसण्याच्या वर्तमानकाळात या ग्रंथाचे प्रकाशन होणे याला पण एक प्रकारची प्रसंगोचितता प्राप्त झाली आहे.

 वर्तमानाइतकी माणसाची घुसमट पूर्वकाळात कधी झालेली नव्हती. त्यामुळे माणूस वर्तमानात अनेक परीने व्यक्त होऊ इच्छितो नि होतोही. व्हॉट्स अॅप, फेसबुक, ब्लॉग, ट्विटर, इतकी माध्यमे कमी म्हणून की काय तो ऑनलाइन जर्नल, फोरम, संकेतस्थळे सर्व ठिकाणी आपले अभिमत अभिव्यक्त करताना दिसतो. सदर ग्रंथातील लेख तीन भागात वर्गीकृत करण्यात आले आहेत. १) संवाद क्रांतीची जादू २) संवाद क्रांती आणि बदल ३) संवादविसंवाद. पैकी पहिल्या भागातील अधिकांश लेख हे संवाद परंपरेची पूर्वपिठिका सांगणारे आहेत. पूर्वी संदेश कसे पाठवत, ते देणारे हाकारे कसे होते, मग हरकारा कसा आला, तो टपाल कसा पोहोचवायचा येथपासून ते भारतात संगणक व संप्रेषण क्रांती १९८६ च्या आशियाई क्रीडा स्पर्धांच्या निमित्ताने कशी उदयाला आली, हे वाचणे मनोरंजक ठरते.

 दुस-या भागात संवाद क्रांतीने मानवी जीवनाच्या विविध क्षेत्रांत घडवून आणलेले बदल अधोरेखित केले आहेत. पत्रकारिता, शिक्षण, वैद्यकशास्त्र, संवाद साधने, शेती, प्रशासन, न्यायव्यवस्था, चित्रपट इ. क्षेत्रात झालेली संवाद क्रांती वाचताना वाचक आश्चर्यचकित होऊन जातो. असे नाही की संवाद क्रांतीने सारे अनुकूल बदल घडून आले. या क्रांतीने माणसाला आत्मसंवादी बनवले. तो आभासी झाला. चेहरा, हावभाव, स्पर्श, आदान, प्रदान, क्रियाप्रतिक्रियांना मुकलेला माणूस एका आभासी जगात आभासी संवाद, संपर्काने आभासी नात्यांच्या भ्रामक जगात जगू लागला. त्यामुळे तो समाज, मनुष्य, संबंधी प्रत्यक्ष संपर्क, संवादाच्या संवेदी, सहअस्तित्वाच्या जाणिवांना पारखा होत पोरका झाला. याचे शल्य तिस-या भागात चित्रित करण्यात आले आहे. आत्मीय संबंधाच्या जगाचं विसर्जन, माणसाचं गायब होणं, भाषा, बदल, मैत्रीच्या नव्या संकल्पना व संबंधाचा उदय नव्या संस्कृतीची अनुभूती होय.

 या ग्रंथात संगणक तज्ज्ञ डॉ. विजय भटकर, संगणकीय जगताचे लेखक अतुल कहाते, दूरशिक्षण संचालक डॉ. आर.एस. तिवारी, सेवाभावी वैद्य डॉ. अनिल मडके, विधितज्ज्ञ अॅड. पृथ्वीराज कदम, समाजशील साहित्यिक राजा । शिरगुप्पे, विदेश मंत्रालयातील ज्येष्ठ अधिकारी ज्ञानेश्वर मुळे, संगणक विश्वाचे प्रवक्ते डॉ. दिपक शिकारपूर प्रभृती मान्यवर लेखक म्हणून भेटत असल्याने नवा जमाना त्यांनी वाचकांच्या हृदयाशी थेट भिडवला आहे. त्यातून येणारी प्रचिती मात्र भेदक खरी!

वेचलेली फुले/२१०