Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/210

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आत्मकेंद्री माणसास अंतर्मुख करणारे पुस्तक : ‘संवादक्रांती'


१ ऑगस्ट, २०१० ला दैनिक सकाळचा ३० वा वर्धापन दिन साजरा झाला होता. हे दैनिक आपल्या वर्धापन दिनी समकालीन महत्त्वाचा एक विषय निश्चित करून त्याच्या विविध पैलूंवर त्या त्या विषय क्षेत्रातील संबंधित मान्यवरांना लेख लिहायला लावते व त्यातून संग्राह्य अशा विशेषांकाची निर्मिती होत असते. सन २०१० च्या वर्धापन दिन विशेषांकाचा विषय होता ‘संवाद क्रांती'. तो अंक संपादित करून प्रकाशित करण्याचे कार्य सकाळ वृत्तपत्र समूहाचे विद्यमान महासंपादक श्रीराम पवार यांनी केले आहे. त्याबद्दल ते अभिनंदनास पात्र आहेत.

 ‘संवाद क्रांती' वाचत असताना जाणवलेली गोष्ट अशी की, सात वर्षांचा काळ उलटला तरी त्याचे विषय महात्म्य गतकाला (२०१०) इतकेच समकालात आहे आणि अतिशयोक्ती न करता मी सांगेन की ते भविष्य काळातही तितकेच राहील. हे पुस्तक संपादकांनी नव तंत्रज्ञानावर स्वार होऊन नव्या जगात मुलूखगिरी करायला निघालेल्या पिढीस...' अर्थातच युवा पिढीस अर्पण करून मोठे औचित्य दाखविले आहे खरे. पण तरी परंतु माझ्यासारख्या ज्येष्ठ वाचकांसाठी ते अरेबियन नाइटसच्या सुरस कथांपेक्षा कमी सरस वाटत नाही. याचे श्रेय सदर ग्रंथातील संवाद क्रांतीच्या विविध पैलूंवर लिहिणाच्या लेखकांना द्यावे लागेल. या लेखाचे विषय संपादकांनी योजनापूर्वक ठरवले होते. त्यातून त्यांची दूरदृष्टी व विषय कवेत घेण्याचा आवाका स्पष्ट होतो. दैनिक सकाळ कोल्हापूरच्या प्रारंभाच्या पहिल्या दिवसापासूनचा मी साक्षीदार व वर्धापन दिन विशेषांकांचा संग्राहक असल्याने मी सांगू शकतो की या अंकाचे विषय वेगळे असतात. आशय भविष्यलक्ष्यी असतात व त्यात वर्तमानाची मशागत करून भविष्यवेध घेण्याची ऊर्मी नि मनीषा असते. ती ‘संवादक्रांती' मध्येही प्रतिबिंबित आहे. वर्धापन दिन विशेषांक म्हणजे जाहिरात संपादनाची नामी नि हुकमी संधी असं. 'सकाळ' ने कधी त्या काळात मानले नाही. त्यामुळे या अंकांना दीर्घकालीन, मृत्युंजयी असे वाचनमूल्य, संदर्भमूल्य, आपसूकच प्राप्त होत आले आहे. ते हा ग्रंथ वाचतानाही जाणवते. हा ग्रंथ एकाच वेळी वाचक, अभ्यासक, शिक्षक, साहित्यिक, संपादक, संशोधक सर्वांच्या आकर्षण व

वेचलेली फुले/२०९