पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/209

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

असतात. हा समूह जीवनाचा वस्तुपाठ व संस्कार असतो. 'रिंगण' नाटकाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे त्याची संहिता सामूहिक चर्चा विचार-विनिमयातून जन्मते व समूहाकडून समूहासाठी सादर होते. त्या अर्थाने 'रिंगण' हे समाजनाट्य होय. हे नाटक सर्वांना कृतिशीलतेतून सर्जनशील बनवते म्हणूनही महत्त्वाचे. हे नाटक प्रेक्षक, रंगकर्मी कलाकार, कार्यकर्ते सर्वांना एक नवी दृष्टी, नवा दृष्टिकोन देते. सामाजिक प्रश्नांकडे पाहण्याची नवी जाण विकसित करण्याचे साधन (हत्यार नव्हे) माध्यम म्हणून त्याची उपयुक्तता लाखमोलाची. 'रिंगण' नाटकांचे आजवर ५00 ठिकाणी प्रयोग झाले. त्यात २५0 कार्यकर्ते रंगकर्मी बनले. त्यातून विवेकवादी विचारधारा बुलंद होण्यास साहाय्य झाले. जीवनासाठी कला' हे वि.स.खांडेकर, प्रेमचंद, शरदचंद्र चतर्जी प्रभृतींचे सूत्र प्रत्यक्षात आले. ज्यांना आवाज नसतो त्यांना स्वर देण्याचे कार्य 'रिंगण' नाटक करते. तो दबलेल्यांचा आर्त नसतो, असतो तो हुंकार, उद्गार!

 ‘रिंगणनाट्य' पुस्तक वाचताना वाचकांना मिळणारा दिलासा उमेद जागवणारा आहे. मागं राहिलेल्या वंचित घटकांना समाजाच्या मध्य प्रवाहात आणण्याचे कार्य भारतीय राज्यघटना करते हे समाज भान, ही समाज दृष्टी हे पुस्तक देते. शिवाय एकट्या वंचित व्यक्तिसाठी विकासाचा हक्क व सामाजिक न्याय मिळवून देणारी घटना म्हणून लोकशाहीतील तिचे महत्त्व हे पुस्तक अधोरेखित करते. हे पुस्तक नाटकाचे तंत्र सांगत माणुसकीचे गाणे, तराणे ऐकवते. नाटक हा शिळोप्याचा उद्योग नसून उभारणीचे तत्त्वज्ञान होऊ शकते, असा विश्वास जागवणारे हे पुस्तक 'एक तरी ओवी अनुभवावी' या न्यायाने मी तर म्हणेन ज्यांना समष्टीगत जीवन अंगीकारायचे असेल, अशा सर्वांनी एकदा कार्यशाळेच्या मांडवाखाली काही दिवस चालवलेच पाहिजे. व्यक्तिशः मी यातून समृद्ध झालो. तुम्हीही व्हावे. कार्यशाळा ते नाटक संहितेची निर्मिती असा प्रवास उलगडणारे हे रिंगण नाट्य पुस्तक म्हणजे वेदनेचा विलाप न राहता विवेकाचा विचार बनतो. हे या पुस्तकाचे खरे योगदान होय.


• रिंगणनाट्य (नाट्य अनुभव)

 लेखक - अतुल पेठे व राजू इनामदार
 प्रकाशक - साधना प्रकाशन, पुणे
 प्रकाशन वर्ष - २०१६

 पृष्ठे - १७८  किंमत - १५0 रु.

♦♦

वेचलेली फुले/२0८