'रिंगणनाट्य' : दिशा आणि दृष्टीचा वस्तुपाठ
बंगालमध्ये असताना तिथले नाट्यकर्मी 'नाटक खेल बो’ (नाटक खेळूया) म्हणायचे. मराठीत नाट्यकर्मी ‘नाटक करूया' म्हणतात. नाटक हा मुळात खेळ आहे. ते करण्याची कृत्रिमता नाटकात आली, ती नाटकाला अभिजात बनवण्याच्या अट्टाहासातून. नाटक यामुळे रंगमंच, नेपथ्य, दिग्दर्शन, वेशभूषा, प्रकाश योजना, संगीत आणि संहितेत करकचून बांधले गेले. बर्टोल्ट ब्रेख्त, ब्रनो एकार्डट, बॉब अर्क्सट्थल, पीटर स्युमन सारख्या नाटककारांनी युरोपातील शेक्सपिअर, शॉ, इब्सेन, चेकॉव्ह प्रभृती नाटककारांच्या पारंपरिक, सांगितिक नाट्यपरंपरेस छेद देत मुक्त नाटक करत प्रायोगिक नाटकांचा मार्ग प्रशस्त केला. नाटक पुन्हा खेळ बनला. या खेळास प्रबोधन, प्रचार, प्रसाराचे माध्यम बनवले सेवोलोद मेये-होल्द यांनी. ही गोष्ट आहे १९१८ ची. विसाव्या शतकाच्या आरंभीच्या काळात ‘आक्टोबर क्रांती'ने जगातील विविध क्षेत्रांत मन्वंतर घडवून आणले होते. ऑक्टोबर क्रांतीच्या पहिल्या वर्धापन दिनाचे निमित्त साधून रंगकर्मी मेये-होल्दने मायोस्कोवस्की या नाटककाराचे ‘मिस्ट्री बुफे' हे नाटक चक्क रस्त्यावर सादर केले. त्या प्रयोगाला, खेळाला उपस्थित प्रेक्षकांनी अक्षरशः डोक्यावर घेतलं. बहुधा ते जगातील पहिले पथनाट्य असावे. साधेपणा, समकालीनता, प्रेक्षकांना साद घालणारे नि त्यांचा प्रतिसाद मिळविणारे संवाद, साधे पोषाख, रोजच्या जीवनातील प्रसंग यामुळे ते नाटक लोकांचे, लोकांनी, लोकांसाठी लिहिलेले नाटक ठरले. त्या अर्थाने ‘मिस्ट्री बुफे' लोकनाटक झाले.
इतिहासाची पुनरावृत्ती होत राहते म्हणतात ना? आपल्याकडे आणीबाणीच्या काळात अगदी असेच घडले. वर्ष होते १९७५. स्थळ-मुंबईचं बोरिबंदर रेल्वेस्थानक (आत्ताचे छत्रपती शिवाजी टर्मिनस उर्फ सी.एस.टी!) 'जागर' संस्थेने आणीबाणी विरोधी पथनाट्य सादर करायला प्रारंभ केला नि पोलीस आले. नाटक ऐन रंगात आलेले. प्रेक्षकांनी पोलिसांना उत्स्फूर्त रोखूनच नाही धरले तर बजावलेही, ‘खबरदार! रिंगण तोडून आत जाल तर रिंगणाच्या बाहेर जिवंत जाऊ नाही शकणार!' खेळ यशस्वी झाला, हे वेगळे सांगायला नको.