Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/203

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

छोट्या साप्ताहिकांना वाचक आश्रय लाभत नसतो. याचे भान राष्ट्रवीरकार शामराव देसाईंना पुरेपूर होते. म्हणूनच स्फुटात ते विविध कार्यकत्र्यांच्या स्थानिक भेटी, देणगी, विनंती, स्थानिक प्रश्नांना प्राधान्य देत इतिहास नोंदवत राहतात. महात्मा गांधी, महर्षी विठ्ठल रामजी शिंदे यांच्या बेळगाव भेटी संबंधीची स्फुटे वाचनीय आहेत. महात्मा गांधी यांनी एप्रिल १९२७ भेट दिली होती. त्या वेळी त्यांना सुमारे साडेतीन हजार रुपयांची थैली अर्पण करण्यात आली होती. प्रकृती अस्वास्थ्यामुळे कार्यक्रम आटोपशीर आखण्यात आला होता. सत्काराला उत्तर देताना ते म्हणाले होते की, “माझ्या आजारपणात चरखा आणि अस्पृश्यता याविषयी मी बराच विचार केला. त्यात या दोन कार्यक्रमांवरील माझा विश्वास वृद्धिंगत झाला. तसेच हिंदू, मुसलमान व ब्राह्मण ब्राह्मणेतर यांच्या ऐक्याविषयीही माझा अढळ विश्वास आहे. या संबंधात कर्नाटक माझी आशा फलद्रूप करील अशी पुरी उमेद आहे. यावरून तत्कालीन वातावरण, परिस्थितीचे भान येते. या खंडात ७२ स्फुटांचा समावेश असून सन १९२१ ते १९५८ पर्यंतच्या सुमारे चार दशकांचा हा सामाजिक, राजकीय, सांस्कृतिक आढावाच होतो.

 पाचव्या खंडात राष्ट्रवीरांचे कॉ. कृष्णा मेणसे लिखित चरित्र वाचनीय आहे. एकसष्टी वृत्तांतून राष्ट्रवीरांची महती अधोरेखित होते. मान्यवरांच्या श्रद्धांजलीपर अभिप्रायांतून त्यांची थोरवी समजते. ग्रंथाच्या शेवटी तीन परिशिष्ट्य संपादकांनी जोडली असून त्यात मॅजिस्ट्रेट ताकीद, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे समर्थन, लेखमालेवरील मान्यवरांच्या प्रतिक्रिया, गुरुवर्य जीवनपट इ. पूरक माहिती पुरवून हा स्मारक ग्रंथ एक पूर्ण संदर्भ ग्रंथ बनवला आहे. शेवटी नाम व संदर्भ सूची जोडून जिज्ञासू व संशोधकांना नेमके संदर्भ शोधण्याची सुविधा पुरविली आहे. अशा प्रकारे संपादकद्वयांनी राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' ग्रंथ सर्व प्रकारच्या व स्तरांच्या वाचकांना उपयोगी होईल याचे ठेवलेले भान लक्षात घेता, त्यांचे अभिनंदन करावे तितके थोडे आहे.

 राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' ग्रंथ आरंभापासून ते शेवटपर्यंत आदर्श स्मारक ग्रंथाचा वस्तुपाठ म्हणून प्रेरक व अनुकरणीय ठरला आहे. या ग्रंथावर राष्ट्रवीरकारांचे रुबाबदार बहुजनी व्यक्तित्व प्रतिबिंबित करणारे जे रेखाचित्र मुखपृष्ठ म्हणून वापरण्यात आले आहे ते राष्ट्रवीरकारांचा करारीपणा, बाणेदारपणास शोभणारे आहे. त्याची रंगसंगती बेळगावच्या लालतांबड्या मातीची आठवण करून देते. ग्रंथाच्या प्रारंभी गुरुवर्यांचे प्रेरणास्त्रोत ठरलेल्या महात्मा ज्योतिराव फुले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांची बहुरंगी चित्रे कलापृष्ठांवर मुद्रित करून मुद्रण सल्लागार निहाल शिपूरकरांनी मोठे

वेचलेली फुले/२०२