Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/202

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

उपाधीने समाजाने गौरविले होते. बहुजन समाजातील कर्मवीर म्हणून इतिहासाने त्यांची घेतलेली नोंद सार्थ अशीच म्हणावी लागेल.

 ग्रंथाच्या प्रथम खंडात प्रा. द. रा. दरेकर यांनी गुरुवर्यांच्या जीवनाची सविस्तर माहिती दिली आहे. त्यातून गुरुवर्यांनी किती प्रतिकूल परिस्थितीत स्वत:स घडविले. शिवाय किती प्रतिकूल परिस्थितीत त्यांनी समाजकार्य केले त्याची जाणीव होते. एखादा ध्येयवेडाच अशा खस्ता खाऊनही लष्कराच्या भाकरी भाजत राहतो. या खंडात शेतकरी कामगार पक्षाचे दाजिबा देसाई, प्रजा परिषदेचे भाई माधवराव बागल, शिवाजी विद्यापीठाचे कुलगुरु डॉ. आप्पासाहेब पवार, इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार, विचारक रा. ना. चव्हाण प्रभृती मान्यवरांचे लेख गुरुवर्यांच्या जीवनाचे विविध कंगोरे समजावत त्यांचे समग्र चरित्र व जीवन मूर्त करतात.

 दुसरा खंड गुरुवर्य शामराव देसाई यांनी पुढाकार घेऊन स्थापलेल्या संस्थांचा विकास वृत्तांत आहे. इवलेसे रोप लावियले द्वारी, त्याचा वेलू गेला गगनावरी। अशी या संस्थांची विकास प्रथा आहे. ती वाचत असताना समाजहित किती दृष्टींनी पहायचं असतं याचा प्रत्यय आल्यावाचून राहात नाही. कर्जबाजारी ऋणको बहुजन समाजास कर्जमुक्त धनको बनविण्याचा गुरुवर्य देसाईंचा ध्याय व ध्येय या सर्व धडपडीतून स्पष्ट होते.

 या स्मारक ग्रंथातील विचारप्रवर्तक खंड म्हणून तिस-या खंडाचे वर्णन करावे लागेल. गुरुवर्य देसाई यांनी राष्ट्रवीर' साप्ताहिकात वेळोवेळी जे अग्रलेख लिहिले त्यातील निवडक ५० अग्रलेख या खंडात संपादक महोदयांनी प्रस्तुत केले आहेत. इथे संपादकांची सव्यसाची दृष्टी दिसून येते. यात विषय वैविध्याबरोबरच भाषा आणि शैली वैभवाची संपादकांची जाण प्रशंसेस पात्र आहे. कर, राष्ट्रीयाकरण, स्वातंत्र्य, शेतकरी, समाज सुधारक, राजकारण, राष्ट्रीय चळवळ, सीमावाद, धर्म, जातीयता अशा विविध विषयांचे अग्रलेखांत पडलेले प्रतिबिंब म्हणजे राष्ट्रवीरकारांच्या व्यासंगाचा पुरावा होय. अग्रलेखांची भाषा सडेतोड असून समाजप्रबोधन त्यांचा उद्देश होता. हे वाचताना लक्षात येते व राहतेही.

 राष्ट्रवीर साप्ताहिकातील अग्रलेखांचे विषय राष्ट्रीय व व्यापक हिताचे राहिल्याने हे साप्ताहिक स्थानिक असले, तरी आशय व विचारांच्या अंगानी राष्ट्रीय स्तराचे होऊन जाते. उलटपक्षी चौथ्या खंडात जी स्फुटे प्रस्तुत करण्यात आली आहेत त्यांचे स्वरूप काहीसे स्थानिक व राज्यस्तरीय आहे. ते स्वाभाविक अशासाठी की स्थानिक वाचकांच्या जिव्हाळ्याच्या प्रश्नांना स्वर दिल्याशिवाय

वेचलेली फुले/२०१