समर्थक राहिले. समाजकार्यास वाहून घेण्याच्या इराद्याने त्यांनी शिक्षकाची नोकरी सोडून पत्रकार होणे पसंत केले. ९ मे १९२१ मध्ये त्यांनी राष्ट्रवीर' साप्ताहिकाचे प्रकाशन सुरू केले. समाज सुधारणा मंडळाची स्थापना (१९२३), नाभिक समाज संघटन (१९२८) मराठा शिक्षण प्रसारक मंडळ (१९३१), चर्मकार समाज तुलसीदेवी प्रतिष्ठान (१९३१), कुंभार समाज संघटना (१९४0), सत्यशोधक परिषद (१९२६) सामूहिक विवाह (१९२६), विणकर सहकारी संघ स्थापना (१९४०) शेतकरी शिक्षण समिती (१९४१), दि मराठा को. ऑप क्रेडिट सोसायटी (१९४२), जयहिंद गिरणी, चंदगड स्थापना, शिक्षण संघ, सुवर्ण औद्योगिक सहकारी संघ असे बहुविध समाजोन्नती कार्य हा त्यांच्या उदारवादी, व्यापक समाज दृष्टीचा पुरावा म्हणून सांगता येईल.
व्यक्तिगत जीवनात जातीय भेदाचे चटके सहन करावे लागल्याने ते खरे तर जात, धर्मनिरपेक्ष बनले. महात्मा फुले यांच्या सत्यशोधक चळवळीने त्यांना देवाकडून निर्मिकाकडे नेले. तत्कालीन पुरोहितशाहीला शह देण्याच्या उद्देशाने त्यांनी बहुजन समाजाचे पुरोहित निर्माण करून ब्राह्मणशाहीस लगाम लावला. गावोगावी प्रबोधन व्याख्याने देऊन बहुजन समाजास देव-धर्म, कर्ज, अंधश्रद्धा मुक्त करण्याचा प्रयत्न केला. सणवार, जत्रा इ. मधील वारेमाप खर्चामुळे बहुजन समाज ऋणको होतो. जत्रा बंदीसारख्या प्रयोगातून त्यांनी अनुकरणीय वस्तुपाठ समाजासमोर ठेवला. शासनकर्तेच देव-धर्माचे स्तोम वाढवत असतील तर प्रजा धर्मनिरपेक्ष कशी होणार असा त्यांना पडलेला प्रश्न त्यांच्या समाजहितकर्ता भूमिकेचे द्योतक होय. विविध जातींच्या, व्यवसायाच्या बांधवांमध्ये संघटन कार्य करून त्यांनी त्यांच्या प्रश्नांना वाचा फोडली. शिक्षण संस्था स्थापून शिक्षणाद्वारे नवी पिढी सुशिक्षित केली. सावकारी पाशातून बळीराजा मुक्त व्हावा म्हणून सहकारी पतसंस्थेची स्थापना केली. बदलत्या काळात लक्ष्मी व सरस्वतीचा मेळ घालत उद्योग रूजवण्याचा त्यांचा प्रयत्न दूरदर्शितेचा होता. विणकर, कुंभार, नाभिक समाज बलुतेदारीत गुंतलेला आणि रुतलेलाही होता. त्यांना गुरुवर्य शामराव देसाई यांनी हक्क मिळवून देऊन 'माणूस' बनविले. हे त्यांचे खरे समाजऋण होत. सावकार व शासनाच्या विरुद्ध करबंदी, खंडबंदी,आंदोलन उभारून कायदेभंग चळवळीतून सत्याग्रहाचा धडा त्यांनी सर्वसामान्यांना दिला. पंचमंडळ नेमून तंटामुक्त खेड्याची कल्पना राबवली व सर्वसामान्यांच्या वेळ व पैशाचा अपव्यय थांबवून समाज सलोखा निर्माण केला. संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्यात ‘राष्ट्रवीर'ची भूमिका न्यायाची होती. या दृष्टीने आपण त्यांच्या जीवन आणि कार्याकडे पाहू लागलो की लक्षात येते की ‘राष्ट्रवीर'कार गुरुवर्य शामराव देसाई हे कर्ते सुधारक होते. म्हणूनच त्यांना समाजभूषण'