Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/200

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य


 ‘राष्ट्रवीरकार शामराव देसाई : जीवन आणि कार्य' हा ज्येष्ठ इतिहासकार डॉ. जयसिंगराव पवार आणि प्राचार्य अनंतराव देसाई या संपादकद्वयांनी निर्मिलेला ग्रंथराज वाचला. हा पंचखंडात्मक ग्रंथ आहे. पहिल्या खंडात गुरुवर्य शामराव देसाई यांच्यावर लिहिलेले चरित्रात्मक लेख आहेत. त्यातून राष्ट्रवीरांच्या जीवन चरित्राचा उलगडा होतो. दस-या खंडात समाजहिताच्या तळमळीपोटी गुरुवर्य शामराव देसाई यांनी ज्या विविध संस्था, संघटना स्थापल्या त्यांचा वृत्तांत आहे. त्यातून एक गोष्ट लक्षात येते की गुरुवर्य जात समर्थक नव्हते तर समाजवर्धक होते. त्यांना अभिप्रेत बहुजन समाज हा सर्व जातिधर्मातील विविधांगी पिचलेला होता. त्या सर्व समाज वर्गांना त्यांना जात, धर्म, अंधश्रद्धा, रूढी, कर्जबाजारीपणातून मुक्त करून समृद्ध जीवन बहाल करण्याचा ध्यास होता. तिसरा खंड हा ‘राष्ट्रवीर' साप्ताहिकांतील निवडक अग्रलेखांचा संग्रह होय. त्यातून राष्ट्रवीरकारांची विचारधारा स्पष्ट होते. त्यातून ते पुरोगामी प्रबोधक, समाजसुधारक म्हणून पुढे येतात. चौथा खंड 'राष्ट्रवीर'मधील स्फुटांना समर्पित आहे. स्फुट लेखन प्रासंगिक असले, तरी त्यात समकालीन इतिहास शब्दबद्ध करण्याचे जे सामर्थ्य असते, ते ही स्फुटे वाचताना लक्षात येते. पाचवा खंड संकीर्ण असून त्यात कॉ. कृष्णा मेणसे लिखित ‘गुरुवर्य शामराव गोविंदराव देसाई : जीवन आणि कार्य', एकसष्ठी समारंभ वृत्तांत थोरामोठ्यांचे गुरुवर्यांबद्दलचे अभिप्राय इ. बाबींचा अंतर्भाव आहे. एका अर्थाने हा स्मारक ग्रंथ राष्ट्रवीरकार गुरुवर्य शामराव देसाई यांच्या जीवन व कार्याची निवडक माहिती देत असला, तरी सुमारे साडेचारशे पृष्ठांतून त्यांच्या चित्र, चरित्र व चारित्र्याचा तो समग्रतापूर्ण आलेख बनतो.

 गुरुवर्य शामराव देसाई यांचा जन्म ४ मे, १८९५ रोजी येळ्ळूर (जि. बेळगाव) येथे झाला. आईचे नाव उमाबाई तर वडिलांचे नाव गोविंदराव होते. शामराव देसाई, मुलकी पास होऊन सन १९१८ मध्ये बेळगावच्या किंग जॉर्ज स्कूलमध्ये शिक्षक झाले. तो काळ सत्यशोधक चळवळीचा होता. स्वत:चा विवाह त्यांनी त्याच पद्धतीने केला व पुढेही आंतरजातीय-धर्मीय विवाहाचे ते

वेचलेली फुले/१९९