पुलोद सरकारने मान्य केले. त्या विरोधात मोठी दंगल झाली. त्यात दलित वस्त्यांना त्याची मोठी झळ सोसावी लागली. या प्रश्नी 'न घर का न घाट का झालेली आपली स्थिती एस.एम.नी खेदपूर्ण शब्दात व्यक्त केली आहे. या लढ्याने परत एकदा भारतीय समाजातील दलित, सवर्ण तेढ प्रकर्षाने लक्षात येते व जातिभेदातीत भारताचे एस.एम.चे स्वप्न किती महत्त्वाचे आहे ते ही प्रकर्षाने ध्यानी येते.
'मी' चा मागोवा
'मी- एस. एम.' आत्मचरित्रातील ‘मी' चा मागोवा' हे प्रकरण अनेक अर्थांनी महत्त्वाचे ठरते. यातून त्यांच्या मानसिक व भावनिक घडणीचा उलगडा होतो व वृत्तीवर प्रकाशही पडतो. एस.एम. लोकमान्य टिळक, पंडित जवाहरलाल नेहरू, सुभाषचंद्र बोस, भगतसिंग प्रभृतींच्या प्रभावाने राष्ट्रीय चळवळीत आले. महात्मा गांधींमुळे ते स्वातंत्र्यलढ्यात सक्रिय राहिले. युसुफ मेहेरअली, आचार्य नरेंद्र देव, आचार्य शंकरराव जावडेकरांमुळे ते समाजवादी बनले. महात्मा गांधींमुळे जीवनात मूल्यांचे अधिष्ठान प्राप्त झाले. सार्वजनिक नैतिकतेचा संस्कार त्यांनी धर्मसंकटातून जोपासला. आचार्य जावडेकरांना ते गुरुस्थानी मानत. एस.एम.नी जे काम हाती घेतले, त्यात जीव ओतला, काठावर उभारायचा त्यांचा स्वभाव नसल्याने झोकून देऊन कार्य करायचे. परिणामांची तमा त्यांनी कधीच बाळगली नाही. प्रसंगी लोकक्षोभाचे ते बळीही ठरले. आपला स्वभाव ते निसर्गाची देणगी मानत. जीवनात पत्नीचे महत्त्व ते गौरवाने मान्य करतात. ‘रात गई, बात गई' म्हणत जीवनातल्या प्रत्येक कटुतेस अपयशास त्यांनी मागे टाकले आणि नित्य नव्याच्या मागे ते संक्रमण करत राहिले. निरंतर कार्यमग्नता, कर्तव्यपरायणता ही त्यांची बनलेली वृत्ती म्हणजे कार्यातून झालेला व्यक्तिमत्त्व विकास होय.
‘माणूस घेता का माणूस' कवितेत वसंत बापटांनी एस.एम.जोशींचे, त्यांच्या वृत्ती, स्वभावाचं सार्थ वर्णन करताना म्हटलं आहे-
कण्व मुनीची कणव
अन दुर्वासाचा शाप
यांना एकवट करून
हा जरत्कारू घडवला आहे
देह झिडपिडा असला
तरी ताकद दधिचींच आहे.
‘मी एस.एम.' वाचताना याची तंतोतंत प्रचिती येत राहण्यातच या