पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/197

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

सिंडिकेट काँग्रेस, समाजवादी विचाराचे पक्ष, जनसंघ इत्यादींनी मान्य केले त्यामुळे जनता पक्ष अस्तित्वात आला. या घडामोडीत जयप्रकाशांनी महाराष्ट्रातील एकीकरणाची धुरा सांभाळली.

 १ मे, १९७७ रोजी जनता पक्ष अस्तित्वात आला, पण निवडणुकीत बहुमत मिळूनही प्रारंभीपासूनच नेतृत्वाबद्दल मोरारजी देसाई, बाबू जगजीवन राम, चौधरी चरणसिंह यांच्यात रस्सीखेच होती. दोन वर्षांतच हा असंतोष हमरीतुमरीवर येऊन पक्ष फुटला. महाराष्ट्रात या पार्श्वभूमीवर पुलोदचा प्रयोग यशस्वी झाला. ८ ऑक्टोबर १९७९ रोजी जे. पीं. चे निधन झाले. निधनापूर्वी जयप्रकाशांनी आपल्या उत्तराधिका-यांपैकी एक म्हणून एस. एम. यांची केलेली निवड ही त्यांच्या नि जे.पीं. च्या सन १९४७ पासूनच्या पाच दशकांच्या मैत्रीचीच खूण म्हणावी लागेल.

मराठवाडा विद्यापीठ नामांतर लढा

 'मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतर प्रकरणी मराठवाड्यातील जनतेची मी समजूत काढू शकलो नाही, हाच आयुष्यातील माझा सर्वांत मोठा पराभव होय.' अशी प्रामाणिक कबुली एस.एम.नी नामांतर' प्रकरणात या आत्मचरित्रात नोंदवली आहे. खरे तर एस.एम.जोशी यांना त्यांच्या सत्त्वशील वृत्तीमुळे अशी नामुष्की, असे पराभव अनेकदा पचवावे लागले. त्याची कबुली त्यांनी या आत्मचरित्रात जागोजागी नोंदवलीही आहे. त्या अर्थाने हे आत्मचरित्र म्हणजे एस.एस.चे एक सामाजिक, राजकीय कन्फेशनच म्हणावे लागेल. पाप, अपराध न करताही ते त्यांना द्यावे लागले. कारण समाजाने त्यांची प्रगल्भता, सदाशयता समजूनच घेतली नाही हे मान्य केले पाहिजे.

 सन १९५७ मध्ये मराठवाडा विद्यापीठ औरंगाबाद येथे सुरू झाले. तत्पूर्वी सन १९५० मध्ये डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी पीपल्स एज्युकेशन सोसायटीची स्थापना करून मराठवाड्यातील शिक्षणाचे मागासपण दूर करण्याचा आपल्या परीने प्रयत्न केला होता. मागासवर्गीय विद्यार्थ्यांना उच्च शिक्षणाची कवाडे खुली करण्याचा उद्देशही त्यामागे होताच. १९५७ मध्ये मराठवाडा विद्यापीठ स्थापनेच्या वेळी ज्या अनेक नावांचा विचार झाला होता. त्यात डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या नावाचाही अंतर्भाव होता. सन १९७७ साली चवदार तळे, महाडचा सुवर्ण महोत्सव साजरा होत असताना मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर डॉ. बाबासाहेब आंबेडकर विद्यापीठ करावे या मागणीने जोर पकडला. मागासवर्गीय अस्मिता विरुद्ध मराठवाडा अस्मिता अशा संघर्षात समन्वयाने 'डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ नामांतर तत्कालीन

वेचलेली फुले/१९६