पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/196

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ला ते राजकीय संन्यास घेण्याच्या विचारात होते आणि बिहारचे आंदोलन उभं ठाकले. आणीबाणी आली. त्याच दरम्यान मराठवाडा विद्यापीठ नामांतराचा प्रश्न उभारला आणि त्यांना परत सक्रिय व्हावे लागले.

बिहार आंदोलन व आणीबाणी

 बिहार हा भारतातील अधिक मागास प्रांत. प्रगती व परिवर्तनाची त्या प्रांताची गरज पाहून एस.एम.नी बिहारमध्ये राष्ट्र सेवा दल शाखा काढणे, भूमी सेना उभारणे इत्यादी कामात वाहून घ्यायचे ठरवले. ते खासदार होते, संसोपा अध्यक्ष पदातून मुक्त झाले होते. सन १९७० च्या दरम्यान ते भारत-नेपाळ सीमेवरील पूर्णिया जिल्ह्यात फिरत होते. तेथील कुर्सेला गाव निवडून त्यांनी कार्य सुरू केले.

 सन १९७४ च्या दरम्यान रेल्वे संप सुरू झाला. इंदिरा गांधींनी तो मोडून काढायचे ठरवले होते. कम्युनिस्ट त्यांच्या पाठीशी होते. याच दरम्यान गुजरातमधील विद्यार्थी आंदोलनाला धार आली होती. जयप्रकाश नारायण यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेस फॉर डेमॉक्रसीच्या माध्यमातून विरोधी पक्ष संघटन कार्य सुरू होतं. इंदिरा गांधींची निवड अलाहाबाद हायकोर्टाने अवैध ठरवली होती. २५ जून १९७५ च्या दिल्लीच्या रामलीला मैदानावरील सभेत ‘जनता आ रही है, सिंहासन खाली करो' या हिंदी कवी रामधारी सिंह 'दिनकर' यांच्या ओळीतून जयप्रकाश नारायण यांनी निवडणूक, समग्र क्रांती, सेनेने अवैध निर्णय मानू नये असं केलेल्या आवाहनाच्या पार्श्वभूमीवर इंदिरा गांधींनी आणीबाणी जाहीर करून जयप्रकाश नारायण यांच्यासह अनेक विरोधी पक्षनेत्यांचे अटक सत्र देशभर राबवले. या सर्वांविरुद्ध एस. एम. जोशी यांनी देशभर दौरे करून जागृती केली. याचा परिणाम म्हणून सन १९७७ मध्ये आणीबाणी मागे घेण्यात आली. एस. एम. जोशी या सर्व राजकीय घडामोडींचे साक्षीदार असल्याने त्यांनी आणीबाणी पर्वाचे सार्थ वर्णन 'मी- एस. एम.' या आत्मचरित्रात अत्यंत संयमाने केले आहे. त्यात स्वातंत्र्यलढ्यासाठी ऐन तारुण्यात प्राणाची बाजी लावणाच्या एस. एम. जोशी यांना सत्तरीतही अशी बाजी परत दुस-या स्वातंत्र्यलढ्यासाठी लावावी लागली. ते वाचत असताना मूल्यनिष्ठेचे महत्त्व मात्र अधोरेखित होत राहते.

जनता पक्ष व सरकार

आणीबाणी मागे घेत इंदिरा गांधींनी निवडणुका घेण्याचे जसे जाहीर केले तसे विरोधी पक्षाच्या एकीकरणास गती आली. तुरुंगवासात सर्वपक्षीयांचे मनोमीलन घडण्याची एक पार्श्वभूमी होती. जयप्रकाश नारायण यांचे नेतृत्व

वेचलेली फुले/१९५