पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/190

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नेत्यात ज्या कालखंडात रूपांतर झाले तो काळ.' पैकी प्रथम काळाचे विवेचन ‘मी एस.एम.' आत्मचरित्रात ‘एक दशकाचे समालोचन' शीर्षकांतर्गत करण्यात आले आहे. स्थूल अर्थाने पहायचे झाले तर एस.एम. पदवीधर झाले नि त्यांनी राष्ट्रीय आंदोलनात उडी घेतली. लोकमान्य टिळक यांच्या व्यक्तिमत्त्वाचा प्रभाव त्यांच्यावर शालेय वयात होता. प्रौढपणी महात्मा गांधींचे गारूड त्यांच्यावर स्वार झाले. असहकारिता आंदोलनापासून ते राजकारणात सक्रिय झाले. ‘लोकसंग्रह' दैनिक वाचून त्यांना घडामोडी कळत. स्वामी श्रद्धानंदांची अब्दुल रशीदनी केलेली हत्या, रौलेट अॅक्ट सायमन कमिशन, यूथ कॉन्फरन्स, नेहरू भेट यातून त्यांच्यातला राजकीय कार्यकर्ता घडत गेला. युसुफ मेहरअली, काकासाहेब गाडगीळ यांनी तरुण एस.एम.ना प्रोत्साहन दिले. पंडित नेहरू पुण्यात आले असताना यूथ कॉन्फरन्समध्ये काकासाहेब गाडगीळ यांनी नेहरूंना एस.एमची ओळख करून देत म्हटलं, "He is S. M. Joshi. He wants to be Jawaharlal Nehru of Poona." नेहरू त्वरित म्हणाले होते की, "Why such a low ambition?" त्या एका छोट्या वाक्याने एस.एम.यांच्या मनात महत्त्वाकांक्षेचे स्फुलिंग पेटवले नि ते पूर्णपणे राजकारणी, कार्यकर्ते बनले. तो काळ खरे तर स्वत:च्या पायावर उभारण्याचा, घरी आईस बळ देण्याचा, पण एस.एम.यांच्या जीवनात प्रारंभापासूनच व्यष्टी विरुद्ध समष्टीचा संघर्ष द्वंद्वात समष्टीचाच विजय होत आलेला.

स्वावलंबन

 या काळात त्यांचं दैनिक केसरीमध्ये नित्य जाणे-येणे होत राहिले. राष्ट्रीय घडामोडीचे ते केंद्र. शिवाय पुण्याच्या हालचालींचेही! न. चिं. केळकर हे टिळकांनंतर केसरीची धुरा सांभाळत होते. पूर्ण वेळ काम करायचे तर राहण्या, जेवण्याची निश्चिंतता अनिवार्य होती. खाणावळीचे १८ रुपये, खोली भाडे ३ रुपये, अन्य खर्च १० एक रुपये, गरज मासिक तीस रुपयांची. काळ १९२८. केळकरांनी त्यांना केसरीचा वार्ताहर बनवून पैशाची व्यवस्था केली, तात्यासाहेब केळकरांच्या त्या मदतीवर पुढचे एस. एम. घडले, मग त्यांनी मागे वळून पाहिले नाही. पुण्याचे पर्वती मंदिर हरिजनांसाठी खुले करण्याचा सत्याग्रह, कायदेभंग चळवळ, मिठाचा सत्याग्रह करत १० मे १९३० ला दुसऱ्या स्वातंत्र्ययुद्धाचा पुकारा करणारे भाषण एस.एमनी केले. अलिबागला केलं, आणि त्यांना अटक झाली. ठाणे तुरुंगात त्यांची रवानगी करण्यात आली. या वेळी एस.एम.नी डिफेन्स न करता तुरुंगवास पत्करला. तो त्यांचा पहिला तुरुंगवास. इथे नवार विणणे, न्हावी काम करत सक्तमजुरी भोगत राहिले. इथे

वेचलेली फुले/१८९