जडणघडण
एकीकडे परिस्थितीच्या प्रतिकूलतेमुळे शिक्षणासाठी त्यांना भ्रमंती करावी लागली. या भ्रमंतीच्या अनुभवातून एक प्रकारचे अकाली प्रौढत्व आलं. ‘काळ', 'केसरी' सारख्या वर्तमानपत्रांनी त्यांच्या किशोर वयातच राजकीय जागृती केली. स्त्री-पुरुष भेद, जात-धर्म भेद, ब्राह्मण-ब्राह्मणेतर भेदांनी त्यांना सामाजिक भान दिले. पुरशामामासारखा घरातील प्रौढ. त्याचा एका ब्राह्मण स्त्रीशी संबंध येतो. त्या अनुषंगाने खेड्यातील खोत एका दुस-या गृहस्थास सांगत होते, “या पुरशाला जर शेण खायचेच होते तर ते आमच्या घरी कशाला? कुळवाड्याच्या बायका काय कमी होत्या?' हे उद्गार ऐकून एस.एम.यांना उच्च नीचतेच्या समाज वास्तवाची जाणीव झाली. ब्राह्मणांच्या बायका शुचिर्भूत राहिल्या पाहिजे. कुळवाड्यांच्या न राहिल्या तरी काही बिघडत नाही. असा तत्कालीन उच्चभ्रूचा दृष्टिकोन म्हणजे जगण्याची अधम पातळीच नव्हे का? लहानपणी शेजारच्या उमाकाकू नावाच्या विधवेला दिवस जाऊन बाळ होते. त्या विधवेची दीक्षित नावाच्या गृहस्थांनी केलेली निर्भर्त्सना त्यांच्या बालमनावर परिणाम करून गेली. त्यातून त्यांच्या मनात स्त्री विषयक विविध प्रश्न व समस्यांचं काहर उभारलं. पुढे ते प्रौढ झाल्यावर राष्ट्र सेवा दलाचे प्रमुख झाले. त्याची ध्येये, उद्दिष्ट्ये, कार्यपद्धती ठरवताना स्त्री-पुरुष समानता मूल्य म्हणून स्वीकारले. आंतरजातीय, आंतरधर्मीय इतकेच नव्हे, तर आंतरभारतीय विवाहांचे एस.एम.यांनी समर्थन केले. स्वतः प्रेमविवाह करून प्रागतिक पाऊल उचलले व व्यक्तिस्वातंत्र्याचा पुरस्कार केला. त्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या राष्ट्र सेवा दलाप्रमाणेच शाखा चालत. पण संघात मुलींना प्रवेश नव्हता. एस.एम.यांनी सेवा दलात मुलींना प्रवेशाचे धोरण ठेवून सेवा दल पुरोगामी बनवले. स्त्रियांना पुरुषांबरोबरीने शाखाप्रमुख केले. त्यामागे एस.एम.याची धारणा होती की, “स्त्रियांना पुरुषांबरोबरीचे स्थान मिळवून देण्यासाठी स्त्रियांहून जास्त शिक्षण (म्हणजे प्रबोधन!) पुरुषांचे झाले तरच स्त्री मुक्तीची चळवळ यशस्वी होईल. महाराष्ट्राचा स्त्री मुक्तीचा विचार सेवा दलातून विकास पावला.
एस.एम.यांच्या जीवन विकासाच्या अवस्थांचे विभाजन ना. ग. गोरे यांनी करताना म्हटले होते की, “१९२३ ते १९३0 हा एस.एम.यांचा पानाआडच्या कळीचा काळ. १९३० ते १९३९ त्या काळीचा वाढीचा काळ. तेथपासून ते संयुक्त महाराष्ट्राच्या स्थापनेपर्यंतचा १९६१ पर्यंतचा काळ म्हणजे एस.एम.यांची एक एक पाकळी उलगडत जाऊन फुलांचे पूर्ण फुल होण्याचा काळ. श्रीधर महादेव जोशी हे नाव धारण करणा-या व्यक्तीचे ‘एस.एम.' या समष्टीच्या