पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/188

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आदेशाबरहुकूम चालतो, वागतो, बोलतो. त्याचं नाव एस. एम. जोशी. त्यांच्या पुढे लोकमान्य टिळक, महात्मा गांधी, स्वातंत्र्यवीर सावरकर, नेताजी सुभाषचंद्र बोस, पंडित जवाहरलाल नेहरूचा आदर्श होता. या सा-यांचा सहवास त्यांना लाभला नि त्या प्रभावळीत ते वाढले. लोकनायक जयप्रकाश नारायण, सेनापती बापट, आचार्य शंकरराव जावडेकर, शंकरराव देव, आचार्य स. ज. भागवत, साने गुरुजी प्रभृती सहकारी त्यांना लाभले. म्हणून त्यांचे जीवन निष्कलंक झाले. यशवंतराव चव्हाण यांनी त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे ‘स्फटिक' या एका शब्दात समर्पक वर्णन केले आहे. ते म्हणतात, महाराष्ट्राच्या सार्वजनिक जीवनात फार थोडी माणसे अशी आहेत की ज्यांच्याबद्दल कोणत्याही परिस्थितीत आदर वाटावा.' म्हणून स्वतंत्र महाराष्ट्र राज्याची स्थापना होऊन यशवंतराव चव्हाण १ मे १९६० रोजी मुख्यमंत्री झाले तेव्हा निघालेल्या मिरवणुकीत यशवंतराव चव्हाण यांच्या बरोबरीने जीपवर विराजमान होते. एस. एम. जोशी. विरोधी पक्षनेते असून एस. एम. ना जो मान मिळाला तो त्यांच्या मूल्यनिष्ठ राजकारण नि चळवळीचा सन्मान होता.

 'मी एस. एम. आत्मकथेच्या प्रारंभी एस. एम. यांच्या हस्ताक्षरातील पत्नी ताराताई यांना लिहिलेल्या एका पत्राचा परिच्छेद आहे. तो वाचला की लक्षात येते, हे आत्मकथन त्यांनी पत्नीशी केलेले हितगुज आहे. आयुष्याच्या धावपळीत तिच्याशी बोलता आलं नाही. उत्तरायणात किरणे तिरपी झाल्यानंतरचे हे मनोगत म्हणजे एका समाजपुरुषाचं भरपाई करत केलेले, स्मरणरंजन होय. हिंदीत त्याला रवंथ' या अर्थाचा परंतु अधिक सार्थक ‘जुगाली' असा शब्द आहे. त्या पत्रात एस. एम. म्हणत असले की, 'माझे जीवन काही अखंड आत्मविकासाचा इतिहास नाही, किंबहुना असंख्य लहानमोठ्या प्रमादांची ती एक साखळीच आहे. हे खोटे, एस.एम. यांचे बालपण जुन्नर (पुणे) गोळप (कोकण) सारख्या गावी गेले. वडील नाझर होते. पण एस. एम. दहा-अकरा वर्षांचे असताना ते सन १९१५ मध्ये निवर्तले. आईने नंतर सांभाळ केला. पण एस. एम. यांचे बालपण, शिक्षण हलाखीतच गेले. ते वार लावून शिकले. पुण्यात गोविंदराव जोशी, एस. एल. आपटे यांच्या घरी हरकाम्या म्हणून राहिले अन शिकले. रमणबागेतून ते मॅट्रिक झाले. न्यू इंग्लिश स्कूलमधून उत्तीर्ण होऊन त्यांनी फर्गुसन कॉलेजमध्ये प्रवेश घेतला. पण शिक्षणाची कड काही लागली नाही. ते सन १९२८ मध्ये अर्थशास्त्र विषयात बी. ए. झाले. पण महाविद्यालयीन सारा काळ म्हणजे एस. एम. यांच्या राजकीय, सामाजिक आणि आर्थिक जडणघडणीचा होता.

वेचलेली फुले/१८७