Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/184

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

काश्मिरी कयामत' : आपत्तीतील माणुसकी


 एकविसावे शतक वरदान व शापाचे छापा-काटा घेऊन आलेले असे नाणे आहे की माणसाला ते कधी स्वर्गसुख देते तर कधी नरक यातना! या शतकांनी माणसास माहिती व तंत्रज्ञान, संगणक क्रांती, जागतिकीकरण, यंत्र सुधार, काळ, काम नि वेगाने जग शून्यवत स्थिर केले. तद्वतच बेकारी, विषमता, आत्मरतता, मूल्य व नैतिकतेचे उद्ध्वस्तीकरण असे वरदान नि शाप समांतर विकसित केले. माणूस दिङ्मूढ आहे. अशा प्रतिकूल काळात ‘सरहद्द' ‘सहमत अशा स्वयंसेवी संस्था जन्माला आल्या. त्यांनी घड्याळाचे काटे उलटे फिरवू पाहणाऱ्या प्रयत्नांना आपले अरूणी बांध घालून थोपविण्याचा यथामती, यथाशक्ती प्रयत्न केला. त्यांनी आपदग्रस्त कुटुंबांना मदतीचा हात दिला.

 अशा कुटुंबातील अनाथ, निराधार मुलांसाठी शाळा, वसतिगृहे, सुरू करणाऱ्या संजय नहार, अधिक कदम यांनी आपल्या सरहद्द' संस्थेमार्फत काश्मीरच्या सरहद्द प्रांत, प्रदेशात जे कार्य केले ते पाहण्यासाठी पत्रकार गुरुबाळ माळी, समीर मुजावर, भारत चव्हाण, शीतल धनवडे सप्टेंबर २०१४ मध्ये काश्मीरला गेले. लहरी निसर्गामुळे संकट उभे राहिले. या काश्मीर दौ-याचा वृत्तांत गुरुबाळ माळी यांनी ‘काश्मिरी कयामत' नावाने शब्दबद्ध केला. त्याला पुस्तक रूप आले. 'कयामत' उर्दू शब्द होय. त्याचा अर्थ प्रलय। पण तो अनेकदा मृत्यू या अर्थाने योजला, वापरला जातो. सरहद्द' प्रमाणेच ‘बॉर्डर लेस वर्ल्ड फाऊंडेशन' ही स्वयंसेवी संस्था आहे. पुण्यातले तरुण ती काश्मीरसाठी चालवतात. या दोन्ही संस्थांचे या पत्रकार दौ-यास साहाय्य होतं. निसर्ग प्रकोपामुळे काश्मीर ऐन दौ-यावेळी पुरानी वेढला गेला होता. अखेरीस दौरा सुरू झाला. श्रीनगरला विमान उतरेपर्यंत पावसाचा जोर कमी झालेला. तरीही पत्रकारांना आपण करू ती पूर्व दिशा वाटत असते. इथे लक्षात आलं पत्रकारपण अळवावरचे पाणी असते.

 एका तीन मजली मशिदीत सर्व पूरग्रस्त जेरबंद होते. इथे कयामतचे एक नवे नाट्य, नवीन जीवन पत्रकार मित्रांनी अनुभवले. त्याची वित्तंबातमी ‘आँखों देखा हाल' म्हणजे ‘काश्मिरी कयामत!' एकावन्न तासांची मृत्यूशी झुंज

वेचलेली फुले/१८३