ती व्हायला हवी. ग्लोबलायझेशनच्या काळात लोकलाइज होऊन राहणे म्हणजे स्थितीशीलता नव्हे का? तरल भाव महत्त्वाचे की तंत्र तरलता? हे ठरवायलाच हवे, तलवार, तालेवार कि तंज्ञवान यावरच तुमचे भविष्य ठरणार? इतिहासाच्या स्मरण रंजनात रमणाच्यांना भविष्य नसते. जे भविष्य घडवू शकत नाहीत, त्याची नव्या इतिहासातील अनुपस्थिती हाच त्याचा न लिहिलेला मृत्युलेख असतो, हे जे लोक समजून घेतात तेच अमर होतात.
डॉ. चंद्रकांत पोतदारांनी आपली कविता नवी करायला हवी. बहुभाषी काव्य वाचनाशिवाय मराठी कवितेच्या कक्षा रुंदावणार नाहीत. हल्ली कितीतरी देशी, विदेशी कवितांच्या अनुवादांचा महापूर मला दुथडीभरून वाहताना दिसतो. प्रफुल्ल शिलेदार, विजय चोरमारे, गणेश विसपुते, मनोहर जाधव, चंद्रकांत पाटील, चंद्रकांत भोंजाळ, लक्ष्मी नारायण बोल्ली, विलास सारंग यांनी किती तरी अनुवाद मराठीत आणलेत. हिंदीत रोज नवे येत राहते. ते कोळून प्याल्याशिवाय नव्या धारेची कविता पाझरणार नाही. गावाचा गलबला, मायेचा पाझर, भूतकाळाची सय माणूस घडवते. पण कविता नवा माणूस घडणीचे हत्यार आपण बनवणार की नाही? वाढता जातीयवाद, असहिष्णुता, धार्मिकता, अराजक जर कवीला अस्वस्थ करणार नसेल तर कवितेचे वर्तुळ रुंदावणार नाही. ते रुंदावावे असे मनापासून वाटते. हे लेखन शल्याचा शिलालेख झालाय खरा, पण इलाज नाही. दर्ज समझ में आयेगा, तो इलाज जरूर हाथ आयेगा! शुभेच्छा! शुभास्ते पंथानः सन्तु।।
कवी - डॉ. चंद्रकांत पोतदार
प्रकाशक - आर्यन प्रकाशक, नेवरी (सांगली)
पृष्ठे - ८८ किंमत - १२० रु.
♦♦