पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/182

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

त्याच एक आश्वासक आशेवर तग धरून तो हरवलेलं शोधण्याचा प्रयत्न करताना दिसतो.

 ‘गाव’ आणि ‘आई'चे कवीचे स्वप्न हा या कवितेचा केंद्रीय विषय. जागतिकीकरण, तंत्रज्ञान क्रांती यात हे स्वप्न हरवलं. त्या पडझडीची झाडाझडती या कवितांच्या प्रत्येक ओळी, शब्दांतून पाझरत, झरत राहते. हतबल आयुष्याचा उच्छ्वास बनत ही कविता धाय मोकलून रडत राहते. कवी त्याला प्राक्तन म्हणतो. पण हा कवीनेच स्वहस्ते व मोहापायी केलेला गुंता होय. त्याची सल त्याला सतत उसवत राहते. व ही कविता जन्म घेते. कवीला हे पुरतं माहीत आहे की ‘इतके का सोपे असते?' दोन्ही डगरींवर पाय ठेवत प्रवास करणं! ‘कुजण्यापेक्षा तगणे बरे आणि जगण्यापेक्षा मरणे बरे' म्हणत तो कुढत, कण्हत जगत राहतो. ‘पराधीन पुत्र आहे जगती मानवाचा' असं उगीच का गदिमांनी म्हटले होते?

 माणसाचे जगणे एक हुलकावणी असते. ते त्याला मुळाशी ठेवत नाही नि कुतरओढ त्याला खंतावत राहते. गाव' नि ‘आई' या कवितेची गलबतं. ती कवीला सतत गहिवरत, गोंजारत राहतात. कवीलाही हा पान्हा जोजवत रहातो. इथेच या कवी नि कवितेची गोची आहे. डॉ. चंद्रकांत पोतदार कविता लिहायला लागल्याला किती दशके सरली, पण शब्दकळा, आशय, विषयांचा परीघ काही रुंदावला नाही. म्हणून माझ्यासारख्याला या कवी नि कवितेचे थांबणे, थबकणे खंतावत राहते. नुसते नवे शब्द, अन् तेही इंग्रजी वापरले म्हणून कविता काही नवी आधुनिक होत नसते. टाईप, प्रिंट, अपडेट, कॅनव्हास, टेंड, रिंगटोन, एसएमएस, लाइफस्टाईल सारखे ‘कितीदा केले टाइप' म्हणून ती आधुनिक होत नाही. नव्या कवितेचा टाइप, पोत तुमच्या हाती गवसला का? माणसाचे जगणे जागतिकीकरणाने, तंत्रज्ञानाने बदलले. प्रिंट मिडिया मागे पडला. इलेक्ट्रॉनिक मिडिया सरसावला. या सरसावलेल्या मिडियाने माणसाला सावरले की बहकावले ते कवितेत यायला हवे. माणसाचा विशेषतः स्त्रिचा रुंदावलेला कॅनव्हास तुमच्या कवितेत प्रतिबिंबित झाला कां? स्त्री ‘देखने की चीज' बदलून ‘सोचने का बहाना' झाली का? हे यायला हवे, तर ती नवी कविता होणार. चाकोरी बदल्याचे यथार्थ चित्रण कविता व्हायला हवी. ती न झाल्याने ही कविता तेच ते भाव, नवे शब्द, बिंब घेत स्वत:भोवती फेर घेत राहते. म्हणून ही कविता मला थांबलेल्या भाव स्वप्नांचे प्रतिबिंब वाटत राहते. उबदार ठेच, काळजाचं गाणं, डोळ्याचा समुद्र, कोंडलेले आयुष्य कळून काळ उलटून गेला. वाढलेल्या पोरीची चिंता नवी का? वर्तमान श्वासाचे तपशील, तुम्हाला किती देता आले या कसोटीवर तुमची कविता नवी होणार.

वेचलेली फुले/१८१