Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/181

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 ‘स्वप्नांच्या पडझडीनंतर' : विकल कविता


 ‘स्वप्नांच्या पडझडीनंतर' हा कवी डॉ. चंद्रकांत पोतदार यांचा नवा काव्यसंग्रह. माझे मित्र सुनील चव्हाण यांनी तो प्रकाशात आणला. मला आठवते त्याप्रमाणे चंद्रकांत पोतदार यांची कविता फुलू लागल्यापासूनच मी साक्षीदार आहे. ते उपजत हळवे आहेत. हळवेपणा एक शाप घेऊन येत असतो. तो एक गुंता असतो. तो भोव-यात अडकवतो. भोवरे अनेक प्रकारचे असतात. भाव भोवरे, शब्द भोवरे, चंद्रकांत पोतदारांची कविता त्यात अडकून राहिल्याचे स्वप्नांच्या पडझडीनंतर' च्या कविता वाचत असताना प्रकर्षाने लक्षात आले.

 कवीला आयुष्य पसारा वाटतो. असा तसा नाही, महाकाय पसारा! पसारा म्हटला की त्यात फापट व्यवहार आले. व्यवहार ही एक गुंताच खरा. हा कवी खेड्यातला. पोटासाठी गाव घरापासून परागंदा झाला. नोकरी, विवाह, कुटुंब असा त्याचाच त्यानं एक पसारा थाटला. माणूस दोन पातळीवर जगत असतो. एक असते लौकिक, भौतिक ती त्याला शरीर वस्तूंच्या जगात आकर्षिते. तिथे आत्मिक, भावनिक उमाळे फिके पडतात नि तो मृगजळामागे धावतो. त्याचा कांचनमृग होतो. उपभोगाचा ऋतू सरल्यावर त्याला त्याचे हरवलेपण खायला उठतं. मुळात तो माती, माणसात वाढलेला. गावगाडा, गोतावळा असा गुंता असतो की त्यात निसर्गाची अस्सल गाठ असते. ती सुटता सुटत नाही नि तुटता तुटत नाही. मग हरवलेला माणूस गाव, घर, माय, गोतावळा हरवल्याच्या शोकात विद्ध होऊन खेटे मारू मागतो, लागतो. पण मग त्याची अवस्था ‘न घर का न घाट का' होऊन जाते. त्याच्या हाती राहते, हात चोळणे नि उसासे टाकणे. या साऱ्या पडझडीची ही कविता. कवीच्या स्वप्नातले जग गावकूस घेऊन मायेची पाखर घेत झुलणारे होते. त्याला काळाने भौतिकात अडकवले. ‘धरले तर चावते नि सोडले तर पळते' अशी त्याची स्थिती. ही तगमग त्याला बेचैन, अस्वस्थ करते. गमावल्याचा पश्चात्ताप शब्दकळा घेऊन उमळत राहतो. हे भावबंधांचे उमाळे म्हणजे स्वप्नांच्या पडझडीनंतरच्या कविता. त्यात जखम आहे, रक्त आहे. पण ती भरेल असा विश्वास या कविता आहे.

वेचलेली फुले/१८0