पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/179

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

स्वतंत्रता आंदोलनात उपजत देशप्रेमाच्या वृत्तीमुळे आकर्षित झाले. १९४२ च्या ‘भारत छोडो' आंदोलनात त्यांनी सातारा, सांगली परिसरातील भूमिगत लढ्याचे नेतृत्व केले. त्यात त्यांना तुरुंगवास भोगावा लागला. तुरुंग फोडून त्यांनी आपली मर्दमकी सिद्ध केली. या लढ्याच्या रोमहर्षक नाट्याने हे चरित्र प्रारंभ करून चरित्रकार माने यांनी मोठे औचित्य साधले आहे.

 वसंतदादांचे घराणे मूळचे सांगली जिल्ह्यातील पद्माळे. पण दादांचा जन्म मात्र कोल्हापुरात. १३ नोव्हेंबर, १९१७ ला झाला. त्यांच्या आई वडिलांचे निधन प्लेगच्या साथीत झाले नि मग त्यांचा सांभाळ मामा-मामींनी केला. वयाच्या दहाव्या वर्षी ते कागलच्या मामा-मामींकडून पन्हाळ्याला आजीकडे आले. घरी पडवीतच शाळा सुरू झाली नि प्राथमिक शिक्षण तिथेच झाले. बाल वयातच त्यांचे मन स्वातंत्र्य आंदोलनाकडे आकर्षित झाले. कुमार वयातच ते सोलापूरच्या ‘ताडी सत्याग्रहात सामील झाले. या आंदोलनात त्यांनी स्वदेशीचा पुरस्कार करत ब्रिटिश पेय चहा वर्ज्य केला. सन १९२८ मध्ये ते राष्ट्रसेवा दलाचे सैनिक झाले. सायमन कमिशनविरोधात त्यांनी सांगलीत 'बंद' यशस्वी केला. पुढे त्यांनी काँग्रेसच्या अनेक अधिवेशनात भाग घेऊन सातारा, सांगली परिसरात राष्ट्रीय काँग्रेसचे संघटन कार्य केले. मिठाचा सत्याग्रह, कसेल त्याची जमीन इ. आंदोलनांत सहभागी झाल्याने ते पूर्ण गांधीवादी बनले. १९३९ साली खादीच्या पोषाखात मालतीबाईंशी त्यांचा विवाह घरगुती पद्धतीने साध्या वातावरणात झाला. लग्न इतके साधे की खर्च होता रुपये पंधरा! वसंतदादा तुरुंगात असतानाच त्यांच्या एकुलत्या मुलीचे निधन झाले. तुरुंगातून सुटून आल्यावर त्यानी भूमिगत कार्यकर्त्यांचे संघटन करून नेतृत्व केले.

 स्वातंत्र्यानंतर ते ‘होमगार्ड'चे कमांडंट झाले. सांगली जिल्हा स्वतंत्र झाल्यावर त्यांनी जिल्हा काँग्रेस स्थापन करून तिचे नेतृत्व केले. स्वातंत्र्यानंतर त्यांनी पक्ष संघटन व रचनात्मक कार्य करत संस्थांचे जाळे विणले. त्यांच्या विविध विधायक कार्याची नोंद घेऊन भारत सरकारने त्यांना १९६७ मध्ये ‘पद्मभूषण' किताब देऊन गौरव केला. मंत्री, मुख्यमंत्री, खासदार, राज्यपाल अशा अनेक सन्मानाच्या जागा त्यांना लाभल्या. पण सर्व पदे, प्रतिष्ठांच्या पलीकडे ते ‘लोकनेते' म्हणूनच जनमानसात लक्षात राहिले. जिवंतपणी त्यांचा पुतळा उभारून सांगलीच्या जनतेने आपल्या आराध्य नेत्याचा गौरव केला.

वेचलेली फुले/१७८