Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/178

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा पाटील : प्रेरक चरित्र


महाराष्ट्र राज्य साहित्य आणि संस्कृती मंडळ, मुंबई या महाराष्ट्र शासनाच्या अंगीकृत उपक्रमाद्वारे मराठी भाषा व साहित्याच्या प्रांतात मूलभूत विषय ग्रंथ, भाषांतरे, शब्दकोश, विश्वकोश, चरित्रे, समग्र वाङ्मय, गौरव ग्रंथ इ. रूपाने मोलाचे योगदान दिले आहे. या मालिकेत सदर मंडळाने अलीकडच्या काळात

 'थोर महात्मे होऊन गेले, चरित्र त्यांचे पहा जरा
  त्यांच्यासम आपण व्हावे, हाच सापडे बोध खरा'
 या ओळींना प्रमाण मानून ‘महाराष्ट्राचे शिल्पकार' या नावाने चरित्रमाला प्रकाशित केली आहे. त्यात महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान झालेल्या व महाराष्ट्राच्या सर्वांगीण विकासात मोलाची भर घालणा-या सर्वश्री यशवंतराव चव्हाण, वसंतराव नाईक व शंकरराव चव्हाण यांची चरित्रे यापूर्वी प्रकाशित झाली आहेत आणि आता दैनिक लोकमत, सोलापूरचे विद्यमान संपादक राजा माने यांनी लिहिलेल्या 'महाराष्ट्राचे शिल्पकार वसंतदादा' या चरित्राचा समावेश झाला आहे.

 वसंतदादा पाटील हे स्वातंत्र्यसैनिक, पक्ष संघटक, सहकारी चळवळीचे खंदे कार्यकर्ते, प्रचंड लोकसंग्रह असलेला नेता म्हणून प्रसिद्ध होते. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून ‘हॅट्रिक’ साधणारे ते एकमेव मुख्यमंत्री. वसंतदादांनी शालिनीताईंशी विवाह करण्याचा निर्णय घेतल्यावर महाराष्ट्रात मोठे वादळ उठले. त्या वेळी वि. स. खांडेकरांनी दैनिक सकाळमध्ये ‘खरेखुरे बंडखोर व्यक्तिमत्त्व' शीर्षकाचा लेख लिहन समर्थन तर केलेच, पण नैतिकतेच्या सार्वजनिक व व्यक्तिगत कसोट्यांची सीमारेषाही स्पष्ट केली होती. अशा वसंतदादांचे हे चरित्र राजा माने यांनी पूर्वदीप्तीशैलीने लिहिले आहे. चरित्र्याच्या सुरुवातीस त्यांनी वसंतदादांच्या स्वातंत्र्यलढ्यातील रोमहर्षक प्रसंगाचे वर्णन करून आपला चरित्र नायक हा ‘जीव धोक्यात घालून स्वातंत्र्यासाठी कसा झटत होता त्याचा प्रत्यय आणून दिला आहे. वसंतदादा तरुण वयातच

वेचलेली फुले/१७७