पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/176

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

हे लोकांना सांगितले. ते जगभरच्या लोकांना भावले. लोकांनी तिला आपल्या शाळेच्या आठवणी लिहायला भाग पाडले. या आठवणींचाच संग्रह म्हणजे ‘तोत्तोचान' हे पुस्तक.

 जपानची राजधानी आहे टोकियो शहर. या शहराच्या दक्षिणेस एक उपनगर आहे जियुगाओका. त्या रेल्वेस्टेशन जवळच तोमोई शाळा भरत असे. कोबायाशी त्या शाळेचे मुख्याध्यापक होते. कूऽऽ गाडीतली ही शाळा तोत्तोचानला आपल्या जुन्या शाळेपेक्षा खूप आवडत असे. तोत्तोचानची ही शाळा रेल्वेच्या डब्यात भरायची. म्हणून तोत्तोचानला कोबायाशी स्टेशन मास्तरच वाटत. शाळेत दुपारी सर्वजण मिळून डबा खात असत. गुरुजीही मुलांबरोबरच आपला डबा दुपारच्या सुट्टीत खात असत. डब्यात सर्वांनी समुद्रातला एक पदार्थ (मासे इ.) आणि डोंगरावरचा एक पदार्थ (भाजी, फळे, अंडे इ.) आणायचा प्रघात होता. आहार समतोल हवा म्हणून गुरुजींचा कटाक्ष असायचा. गुरुजी सर्वांचे जेवण पाहून मग स्वतः खात. घास बत्तीस वेळा चावून खाण्याकडे लक्ष असायचे.

 शाळेत भाषा, गणित, विज्ञान, निसर्ग, संगीत शिकवण्यावर भर असायचा. निसर्ग शिक्षणासाठी डोंगर तळी, नदी, नाले, जंगल इत्यादींना भेटी दिल्या जात. शाळेचे ‘तोमाई' हे छोटे गाणे सगळे म्हणत. त्याला संगीताची साथ असे. मुलांना शिक्षक स्वातंत्र्य देत. एकदा तोत्तोचानचा बटवा संडासात पडला. तर गुरुजींनी तिला तो दिवसभर घाणीत शोधू दिला. अट एकच होती. उपसलेली घाण तिची तिने भरायची. स्वातंत्र्यातून ते जबाबदारीची जाणीव देत. शाळेचे छोटे ग्रंथालय होते. तेही रेल्वेच्या डब्याच्या आकाराचेच. मुले मनापासून वाचत. शाळेस पुस्तके भेट देत. शाळेत पोहण्याचा तलाव होता. कोबायाशी लहान मुलांना पोहायला शिकवत. पोहताना कपडे घालायचे, न घालायचे स्वातंत्र्य ते मुलांना देत. मनमुराद डुंबणे म्हणजे पोहणे, शाळेत मुलांना बागकाम, मातीकाम शिकवले जायचे. शाळेत काम करताना मुलांना कपड्याची काळजी नको म्हणून साधे, घाण कपडे घालून आले तरी चालायचे हे विशेष! शाळेचे प्रगती पुस्तक होते. त्यावर अ,ब,क शेरे असत. पण सर्वांना सारखे वागवले जायचे. सर्वांवर बाई, गुरुजीसारखे प्रेम करत. मुलांचा अपमान होऊ नये अशी काळजी घेतली जायची. चुकून कुणी शिक्षकांनी मुलांना दुखवले तर कोबायाशी चिडत, बोलत पण मुलांसमोर नाही. उन्हाळी सुट्टीत शाळेत शिबिर असायचे.

वेचलेली फुले/१७५