पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/175

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

'तोत्तोचान' : शाळा व शिक्षकांची महत्ता


‘तोत्तोचान' नाव आहे एका जपानी मुलीचे. तिच्या आई-बाबांनी तिला एका शाळेत घातले. इयत्ता पहिलीमध्ये. पहिलीतील चिमुरडी पोर ती. पण तिच्या शाळेतील बाईंनी तिचे नाव शाळेतून चक्क काढून टाकले. का काढले तिला शाळेतून? तर ती बाईंच्या शिकवण्याकडे लक्ष नाही द्यायची. सतत वर्गाच्या खिडकीजवळ बसायची. तिच्या वर्गाला लागून एक रस्ता होता. लोक सतत येत-जात असायचे. ती त्यांना हाका मारायची. इकडे बाई वर्गात शिकवत असायच्या. तिकडे तोत्तोचानचे अनेक उद्योग, खोड्या सुरू असायच्या. एकदा तर तिनं रस्त्यावरून जाणा-या बँडवाल्यांना बोलावले आणि चक्क बँडबाजा वाजवायला लावला. बाईंनी तिच्या खोड्यांना कंटाळून तिचे नाव काढलं.

 पण तोत्तोचानची आई आपल्या आईसारखीच प्रेमळ होती. ती तोत्तोचानला रागावली नाही. तिला हेही कळू दिले नाही की बाईंनी तिला शाळेतून काढून टाकलंय म्हणून! तिची आई एका शाळेबद्दल ऐकून होती. त्या शाळेचे नाव होतं 'तोमोई” ती शाळा सोसाकु कोबायाशींनी सुरू केली होती. ते संगीताचे शिक्षक. युरोपमधून ते संगीत, नाच, ताल शिकून आले होते. तिथून येऊन त्यांनी एक बालवाडी सुरू केली होती. 'साईजो' तिचे नाव. या बालवाडील कोबायाशी मुलांना त्यांच्या स्वभावानुसार हसू, खेळू, बागडू देत असते. नंतर त्यांनी १९३७ साली ‘तोमोई' शाळा सुरू केली. ती सात-आठ वर्षीच चालली. १९४५ साली या शाळेला आग लागली आणि ती जळून खाक झाली. कोबायाशींनी ही शाळा स्वत:च्या पैशातून बांधली होती. शाळेचे वर्ग म्हणजे रेल्वेचे डबे. निसर्गाची त्यांना खूप आवड होती. ते आपल्या मुलांना संगीत, निसर्ग, आकाश सारे शिकवत. तोत्तोचान इथेच शिकून मोठी झाली. मोठी होऊन ती टी.व्ही. वर कार्यक्रम करू लागली. तिने एका कार्यक्रमातून तोमोई शाळा, आपले कोबायाशी गुरुजी, ते कसे शिकवत, प्रयोग करीत, प्रेम करीत

वेचलेली फुले/१७४