Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/173

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आमटेंना वाटते. ‘अतिमानवाचे परत फिरणे' कवितेत ते जगातल्या सर्व विचारधारांची चिकित्सा करतात. देववाद, दैववाद, बुद्धिवाद, अस्तित्ववाद यांच्यापेक्षा त्यांना मानवतावादच श्रेष्ठ वाटतो. सुख, सामर्थ्य, सत्ता, सौंदर्य यांना मानवी जीवनात महत्त्व असते हे खरे, पण जग संघर्षमुक्त करायचं असेल तर ‘सुताराचं पोरच' ते करू शकेल. कारण त्याचं साधेपण हेच त्याचे सामर्थ्य असतं असं स्पष्ट करून ते अहिंसेची शिकवण श्रेष्ठ ठरवतात.

 ‘एकोणिसाव्या शतकात आदिमानव गुलाम होता
 विसावे शतक हे त्याच्या मुक्तीचे शतक आहे.
 आणि एकविसाव्या शतकात
 तो जगाला तारणार आहे.'

 यातला 'तो' म्हणजे ईश्वर नव्हे. एकविसाव्या शतकाचा तारणहार, हलधर, शेतकरी, कुष्ठपीडित, दलित, वंचित, उपेक्षित आहे. त्यांचं जीवन श्रमसरितेच्या काठावर एक नवी श्रम संस्कृती, एक नवं श्रमशास्त्र, एक नवं श्रमतंत्र उभारत आहे. ते त-हेत-हेचे सामाजिक कंस काढून जग ‘कंसमुक्त' करतील, अशी त्यांची श्रद्धा आहे.

 ‘संप्रदायाचे कंस आणि वादांचे कंस
 वर्णाचे कंस आणि वर्गाचे कंस
 राष्ट्रांचे आणि संस्कृतीचे कंस
 माणूसमाणूस अलग करणारे छोटे मोठे कंस.

 ‘माझे कलियुग' कवितेत स्वत:चं कलियुग निर्माण करण्याची महत्त्वाकांक्षा व्यक्त करतात. इतिहास नाकारत एका नव्या भविष्यास लक्ष्य करतात.

 ‘शिवधनुष्याचा महिमा गाणारे
 ते उचलू शकत नाही
 आणि इतिहासात रेंगाळणारे
 इतिहास घडवू शकत नाही. (माझे कलियुग)

 यातून हा नवा विश्वामित्र नवी सृष्टी निर्माण करू पाहतो हे स्पष्ट होतं. या नव सृष्टीत ‘मे फ्लाय संस्कृती' ला स्थान नाही.
 ‘मे फ्लाय' ही एका उडणाच्या किड्यांची जात आहे
 त्यांना तोंडही नसते आणि पोटही नसते!
 फक्त विलासी इंद्रिये त्यांना असतात.
 रतिक्रीडा हेच त्यांच्या अस्तित्वाचे महाकारण
 तोंड आणि पोट यांच्यासाठी

 या मे फ्लाय संस्कृतीलाही

वेचलेली फुले/१७२