‘ज्वाला आणि फुले' : जहाल वेदनांची गीते
कार्य हेच ज्यांचे जिवंत महाकाव्य होते त्या बाबा आमटे यांचे जीवन कार्य, साहित्य, वक्तृत्व सारेच काव्यभारित होते. विचार व आचार यांत सुसंगती होती. त्यांनी जे लिहिले ते सारे विचारप्रवण, कृतिकेंद्री होते. अंतर्मुख करणारे आहे. त्यांचे समग्र साहित्य कृती, विचार व कलात्मकतेचे संयुक्त रूप होतं.
ज्वाला आणि फुले या काव्यसंग्रहाचे वर्णन वि. स. खांडेकरांनी ज्वलंत व्यक्तिमत्त्वाचा काव्यात्मक आविष्कार असं केले आहे. साहित्यिक, चिंतक, कलाकार, कार्यकर्ता म्हणून बाबा आमटे यांना समजून घेण्यासाठी ज्वाला आणि फुले वाचायला हवे.
साने गुरुजी, वि. स. खांडेकर, खलील जिब्रान, स्टीफन झ्वाइग, प्रेमचंद, यशपाल असे अनेक साहित्यिक मला आवडतात. एखाद्या साहित्यिकाची रचना आपल्या भावविश्वात चिरस्थानी ठरण्याची अनेक कारणे असतात. ती कलाकृती गाजलेली असते, ती आपल्याला आवडते, अस्वस्थ करते. प्रेरणा देते, अंतर्मुख करते, संकटात मार्गदर्शन करते. एकांतात मित्र होते. प्रत्येक वाचनात ती ‘कॅलिडिओस्कोप' सारखे नवे काही तरी दाखवते, देते. अशी एक ना अनेक कारणे असतात. अशा जीवस्य कंठस्य साहित्यकृतीमध्ये ‘ज्वाला आणि फुले' या बाबा आमटे यांच्या काव्यसंग्रहाला अग्रस्थान आहे. हा काव्यसंग्रह म्हणजे आयुष्यातला मोठा ठेवा आहे.
‘ज्वाला आणि फुले' मधील कविता आयुष्याच्या वेगवेगळ्या वळणावर मला भेटत राहिल्या. सन १९६३-६४ मध्ये मी आठवीत होतो. वि. स. खांडेकरांनी स्थापन केलेल्या ध्येयवादी शाळा म्हणून लौकिक असलेल्या आंतरभारती विद्यालय, कोल्हापूरमध्ये शिकत होतो'. 'माणूस', 'मनोहर', ‘साधना', 'अमृत', 'कुमार', ‘बहुश्रुत माला' सारखी नियतकालिके शाळेत येत. वर्गात अभ्यासाबरोबरच अवांतर शिकवण्यावर भर असायचा. हे वाचा, ते ऐक, हे पाहिले का? (चित्र, सिनेमा, शिष्य, देश-प्रदेश, निसर्ग असे बरेच काही त्या वेळी सांगितले जाई.) साधना साप्ताहिक चाळायचो. ते आपले