पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/162

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

नवा तळ घेऊन येते. दीप्ती, तिचा नवरा दिलीप, मुले जयवंत, अजित सारे कुटुंब स्वीमर असते. नवरा दिलीप व मुलगा अजितचा मृत्यू पोहताना झाल्याने हादरून, हारून गेलेली दीप्ती शेवटचा मुलगा जयवंतला पाण्यापासून दूर ठेवते तरी आनुवंशिक आकर्षणाने तो पोहायला शिकतो व जलतरणपटूही होतो. आईची घालमेल मार्मिकपणे चित्रित करणारी ही कथा मानसशास्त्रीय पटलावर पसरत मानवी संबंध कथा बनते. ती क्रीडेपेक्षा जीवनस्पर्शी अधिक झाली आहे.

 'नंबर वन'मधील या साऱ्या कथांचा धांडोळा घेताना लक्षात येते की, कथालेखन ज्या विषयांवर आपली कथा बेतू इच्छितो त्याबद्दल तो भरपूर स्वाध्याय करतो. विषयाच्या सर्वांगाची तो माहिती घेतो. त्यातली तांत्रिकता तो खोलात जाऊन समजून घेतो. ‘फिरूनी नवी जन्मेन मी' कथेतील नायिका मीनामधील लैंगिकतेतून होणारे शारीरिक, मानसिक, जैविक, भावनिक बदल, वैद्यकशास्त्रातील या संबंधीचे बारकावे, संज्ञा, विधीशास्त्रातील या प्रश्नाची बाजू, शिवाय व्यक्ती म्हणून मीनाच्या मन, भावांचे तरंग, संबंधातील आकर्षणविकर्षण, त्यातील ताणतणाव त्याचा खेळ, करिअरवर होणारा परिणाम यांचा लेखकाने केलेला अभ्यास वाचकास स्तिमित करतो. क्रीडा विश्वाची स्वत:ची एक नशेची दुनिया असते. ती लक्ष्मीकांत देशमुखांना दीर्घ सान्निध्यानी अवगत झाली आहे. ती ते भाषा शैली, संवाद, पत्र, काव्य, म्हणी सर्व प्रकारच्या कला उपकरणांचा वापर करून मनोहर, ललित करतात. ते मराठवाड्यातील असल्याने असेल, त्यांच्या भाषेवर उर्दू प्रभाव दिसून येतो. खुदा, साब, बेगम, अल्ला, रोकणारे, धक्के, सैतान, चहाणं अशा शब्दांतून तो स्पष्ट होतो. इंग्रजी प्रचूर मराठी ही 'नंबर वन' ची प्रमाण भाषा वाटावी इतका तिचा सर्वत्र दखल. मराठीत एखादा एकदम नवा शब्द जसा’ ‘फिकुटला' (पृ.७७) समर्पक असला, तरी चमत्कृत वाटतो.

 काही कथांत लक्ष्मीकांत देशमुख यांनी पत्रशैलीचा चपखल प्रयोग करून नातेसंबंधाची सहज प्रस्तुती केली आहे. 'प्रयासे जिंकी मना' कथा या संदर्भात लक्षात राहते. कवितेच्या ओळींचा वापर करून कथाशय समृद्ध व ललित करण्याची लेखकाची हातोटी विलक्षण म्हणावी लागेल, ‘प्रयासे जिंकी मनातही ती दिसते व अन्यातही. कुठे फ्लॅश बॅक, कुठे वर्णन तर कुठे मनोविश्लेषण असे शैली वैविध्य या कथासंग्रहास लाभल्याने तो मनोज्ञ तसाच कलात्मक झाला आहे.

 ‘नंबर वन'मधील पात्रे परिचित वाटावी असे त्यांच्या चित्रणात साम्य

वेचलेली फुले/१६१