पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/156

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

न समजणारे जग आजूबाजूला... तरी मी चालतेचि वाट... असे का? याचा शोध घेणारी अन बोध देणारी ‘उधाण वारा' कथा सर्वांनी विशेषतः जीवनाचा निर्णय घेण्याच्या वयातील तरुण-तरुणींनी अशासाठी वाचायला हवी की ती धोक्याचा इशारा देतेय... ती तुमची बोट थडकून फुटण्यापूर्वी या आत्मकथेच्या वाचनातून येणा-या प्रगल्भतेमुळे कदाचित तुम्ही वाचवू शकाल. त्यासाठी इंद्रमुक्तीची शर्त मात्र आहेच!

 या आत्मकथेत जीवनातील सर्व इंद्र भेटतात. श्रद्धा-अंधश्रद्धा, विश्वास अविश्वास, आपपरभेद, जीवन मरण, माणूस की दगड, भीती-अभीती, सारे असल्याने कालमर्यादेतही ही आत्मकथा जीवन सर्वस्व घेऊन येते. जीवनातल्या साच्या गोष्टी काही कथा, कादंब-या, सिनेमासारख्या नसतात हे लोकशिक्षण देणारी ही आत्मकथा वाचनीय, विचारणीय बनते ती तिच्यातील जीवन शिक्षणाच्या मूल्यांमुळे. तसलिमा नसरीनच्या बंडखोर व्यक्तिमत्त्वाचा शोध या आत्मकथेतून उमजतो. स्त्री स्वप्रज्ञ, स्वयंसिद्धा, स्वयंप्रेरिका होते ती पुरुषाच्या नाकर्त्या, बेजबाबदार वागण्यानं. त्या अर्थाने ‘उधाण वारा' पुरुषांसाठी अप्रत्यक्षरित्या एक ‘जागर कथा' बनते. 'मी काही खूप चांगला नाही, याचे कारण तुझे चांगले असणे आहे. ही यातील रुद्रची तसलिमाबद्दलची कबुली (पृ. २२५) म्हणजे तमाम पुरुषांच्या वतीने रुद्रने दिलेला कबुलीजबाब होय. ‘उधाण वारा' ही स्त्री दु:ख भोगाची व पुरुषाच्या सुख उपभोगाची एकाच वेळी परस्परपूरक व परस्परविरोधी असणारी अगम्य कहाणी आहे.


{{block right|• उधाण वारा (आत्मकथन)
 लेखिका - तसलिमा नसरीन
 अनुवाद - विलास गीते
 प्रकाशक - मेहता पब्लिशिंग हाउस, पुणे
 प्रकाशन वर्ष - २०१०
 पृष्ठे - ४५८  किंमत - ४00 रु.

♦♦

वेचलेली फुले/१५५