पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/151

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

करत राहायचे? पुरुष प्रत्येक वेळी नामानिराळा विश्वामित्र का? हा या आत्मकथनाने न विचारलेला, उच्चारलेला प्रश्न?

 रजनी भागवतांच्या अनुवादाचे विशेष हे की त्या मराठी अनिता राकेश होतात. त्यामुळे लेखिका नि अनुवादिका दोन्ही माहीत असलेल्या माझ्यासारख्या वाचकास ही कथा रजनी भागवतांची वाटायला लागते. इतका अस्सल परकायाप्रवेश फारच कमी अनुवादांत आढळतो. ही आत्मकथा अनिता राकेशांची एक स्मरणसाखळी आहे. तीत त्या आपल्या जीवनाचा एक एक हृदयस्पर्शी प्रसंग उत्कटपणे ओवतात. एक स्त्री इतके खरे कसे सांगते, याचं पुरुषवाचकांना आश्चर्य, नि स्त्रीवाचक अनिता राकेशांबद्दल अशासाठी चकित की स्त्रीनं मनातले सगळे सांगायचे असते का?

 ...मी प्रेम करते, दारू पिते, सिगरेट पिते, मी समलिंगी आहे (अपवाद म्हणून का असेना!) या या पुरुषांबद्दल मला हे हे वाटले...याला मी नाकारले... यापासून मी लांबच राहिले... त्याला दोन हात दूरच ठेवले...याला आकर्षण म्हणून तर त्याला गरज म्हणून जवळ केले...तद्दन अर्धसत्य, फसवे, वरवरचे लिहिणाच्या मराठी लेखक पत्नींच्या आत्मकथांच्या पार्श्वभूमीवर हे आत्मकथन उजवे अशासाठी की ते सारे नितळपणे सांगते. ना खंत, ना खेद, असा सारा लेखनाचा बाज. पदरी पडेल ते पवित्रपणे निभवायची नायिकेची जीवनशैली. इतकी बिकट परिस्थिती आली म्हणून तिने कुणापुढे हात पसरले...अगदी सासूकडेही (अम्मीजी) असे नाही. अपवाद इंदिरा गांधी, लेखन, रॉयल्टीवर ती जगते तशी राकेश यांच्या प्रतिष्ठेवरही. तेही ते प्रांजलपणे कबूल करण्यातील प्रामाणिकपणा ही या आत्मकथेची नजाकत. तोच तिचा नजराणाही. पुस्तकों चंद्रमोहन कुलकर्णीचे मुखपृष्ठ अनिता राकेश यांच्याच शब्दात सांगायचे झाले तर या आत्मकथनाचा आरसा नि खरेखुरे प्रतीक!'

 आत्मकथा वाचताना अनेक ओळी अधोरेखित करण्याचा मोह वाचकात निर्माण करण्याचे सामर्थ्य कथेच्या आशयाबरोबर लेखिका/अनुवादिकेच्या भाषा प्रभुत्वात आहे. ओघवत्या शैलीमुळे लेखिका आपल्याजवळ बसून सांगतेय... हे शीर्षकात जसे आहे तसे निवेदनातही. लेखिका वाचता वाचता वाचकांची जिवाभावाची सखी, भगिनी होते हे या आत्मकथेचे खरे यश. आई-मुलगी एकमेकींच्या स्पर्धक होणे, सवतीची असंवाद गळाभेट, अनिताचे बच्चनांच्या घरी जाऊन न सांगता बरंच काही समजावून येणे, पोलिसांच्या नजरेतील 'नर'पण (पुरुषास स्त्री नराधम का म्हणते सांगणारं!) लेखक, संपादकांकडे येणारे लाळघोटे, प्रत्येक पुरुषाचं ‘धोबी' (रामायणातला) असणे अशा कितीतरी

वेचलेली फुले/१५०