माळ बनावी. अशी प्रसंगांची मालिका या आत्मकथेस कलात्मक ललित बनवते. कधी काळी आपल्या आईकडे, माँकडे, गहाण असलेले आपले आयुष्य ती ज्या सोशिक समजदारपणे सोडवत समृद्ध करते ते पाहिले की, स्त्रीमधील सहनशक्तीचे आश्चर्य वाटल्याशिवाय राहत नाही. काही गंभीर, भीषण प्रसंगांचा मी साक्षीदार असल्याने प्रा. आशा अपरादांनी दाखवलेला संयम केवळ खानदानीच ठरतो.
या आत्मकथेत बाप-लेकीचा संवाद, सहवास, संस्कार वाचला की उभयतांची जगण्याची ताकद उमजते. आई - 'मा'स - आशा आपराद सतत दूषण देत आल्या... त्यांनी हे समजून घेतलं पाहिजे की मुस्लीम समाजात वैधव्य येणं... त्यातून वाट काढणं... म्हणजे ‘रात्रंदिन युद्धाचा प्रसंग' असलेली आई भ्रमिष्ट, आतंकितच राहणार ना? स्वभावाला औषध नसते हेच खरे! आपल्या वडिलांबद्दलची लेखिकेची आस्था, आत्मीयता सार्वत्रिक... तिने वडिलांच्या खांद्यावर झोपणे... वेताळासारखे (पृ.६) वडिलांनी मांडीवर घेऊन झुलवत झोपवणे याचं अत्यंत हृदयस्पर्शी वर्णन केलंय. लेखिकेकडे प्रसंग चित्ररूप करण्याची विलक्षण हातोटी आहे. सोन्या मारुती चौक, स्मशान वाट, पूर, टवाळखोर मुलांना कॉलेजात आई म्हणून निरुत्तर करणं, आंबेवाडीत अपरात्री चेष्टा करणा-यांना धारेवर धरणं यासारख्या प्रसंगातून ते स्पष्ट होते. चरित्रचित्रणातही त्यांचा हातखंडा लक्षात येतो. आई-वडील म्हणजे दक्षिण व उत्तर असे परस्परविरुद्ध ध्रुव. पण त्यांचे वर्णन करताना त्या देवाचे देवाला व सैतानाचे शैतानाला देऊन मोकळ्या होतात. प्रसंगवर्णनात लेखिकेची अशीच हुकमत दिसून येते. उगीच गळेकाढूपणा नाही. ज्यांना कुणाला जगण्याच्या उद्वेगाने पछाडले असेल... जे आत्महत्या करण्याच्या विचारात असतील त्यांना ही आत्मकथा या ‘जगण्यावर शतदा प्रेम करावे', असा आशावाद जागविल्याशिवाय राहणार नाही.
चंद्रमोहन कुलकर्णी यांनी बक्षिसाचा चषक उदान करण्याचा कठोरपणा करण्याच्या आईच्या जुलमाला न कंटाळता आशा यशाचा सूर्य उगवून दाखवते. हे मोठ्या ताकदीनं चित्रित करून २७३ पानांची सारी कथा, व्यथा, गाथा एका मुखपृष्ठात रेखाटली आहे. अनेक प्रसंग, अनेक व्यक्ती, अनेक भाव यांनी भरलेले हे आत्मकथन इतक्या संयतपणे कसे लिहिता येते, ते भोगिले जे दु:ख त्यालाच ठावे. लेखिकेने काव्य, म्हणी, विश्वविख्यात रचनांचे दाखले देत