अद्याप पूर्ण सुटलेले जरी नसलं तरी प्रा. आशा अपरादांचे समग्र जीवन वाचताना लक्षात येते की माणसाच्या आत आत जोवर स्वयंप्रकाश नि विकासाचे आपसूक घडणारे उद्रेक असत नाहीत, तोवर त्यांच्या अंधाच्या जीवनात विद्युल्लतेचा कल्लोळ कडाडत नसतो. नाही तर हे कसं शक्य आहे, की कुटुंबात खायची भ्रांत, शिक्षणाचे म्हणाल तर आसपास सारे सह्याजीराव नि अंगठाबहाद्दर. आशालाच शिकावेसे का वाटत राहते. ज्याच्या जीवनात यातनांचा उच्छाद असतो अशांच्याच जीवनात स्वप्नांची चंदेरी वृष्टी घडून येते... अन्यथा हे कसे शक्य आहे की रिक्षा ड्रायव्हरचा एस.टी. ड्रायव्हर झालेला आशाचा नवरा दस्तगीर आपराद निवृत्तीच्या दिवशी स्वत:च्या सँट्रोतून घरी येतो, तेही चार सुशिक्षित मुली, जावई, नातवांसह, ‘भोगले जे दु:ख त्याला' ही आत्मकथा एका मुस्लीम कन्येची करुण कथा नसून शिक्षण, प्रयत्न, साहस व चिकाटीतून कायाकल्प घडू शकतो. अशा आश्वासक संस्कारांची प्रेरक व अनुकरणीय क्रांतिकथा म्हणून पुढे येते.
ही आत्मकथा मुस्लीम समाजजीवनातील स्त्रीशिक्षण, स्वावलंबन, पुरोगामित्व इ. स्त्रीस माणूस बनवणाच्या बदलांचे भीषण वास्तव अधोरेखित करत असले, तरी ही कथा मूलतः जात, धर्म, वंश या परंपरांना छेद देणारी माणूसपणाची व्याकूळ कहाणी आहे. प्रा. आशा आपराद यांनी ती मनस्वीपणे लिहिली आहे. ही आत्मकथा लिहिण्यामागे आपणास भोगाव्या लागलेल्या भोगांची रामकहाणी सांगून केवळ स्वत:चे मन हलके करण्याचा व्यक्तिगत स्वार्थ व संकुचित हेतू नाही. आपल्यामागून येणा-या अशा मुलींच्या जथ्यास बळ नि प्रेरणा देण्याचा हेतू आहे. आपला आत्मशोध घेत त्या दुस-याचे अंधारले जीवन उजळावे म्हणून धडपडताहेत. पुरोगामी मुस्लीम परिषद, अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महिला दक्षता समितीतून त्या करत असलेले कार्य, आपल्यास दिसलेला प्रकाश दुसऱ्यांच्या जीवनातही त्या उजळू पाहत आहेत.
आशा अपराद यांची भाषा हृदयाचा ठाव घेणारी संवेदनशील आहे. मुस्लीम परिवारातील बोली संवाद जागोजागी आल्याने मुस्लीम कुटुंबाचे जिवंत चित्र उभे राहते. ही बोली बोधगम्य व्हावी म्हणून लेखिकेने पुस्तकाच्या शेवटी शब्दार्थ परिशिष्ट जोडून आपले लेखन सुबोध बनवले आहे. लेखिकेस दैनंदिनी लिहिण्याचा छंद असल्याने ती आपल्या जीवनातील अनेक छोटे मोठे बारकावे सुसंगतपणे मांडू शकली. त्यामुळे मण्यामागे मणी ओवत जाऊन सुरेख