पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/141

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

आता करायला हवा. संपूर्ण स्वातंत्र्य, लोकांचे सार्वभौमत्व, खरी धर्मनिरपेक्षता, लोकशाही, समाजवाद व संघराज्यीय एकात्मता हीच या देशास खरे लोकसत्ताक बनवू शकते असा आचार्यांचा विश्वास सदर चिंतनिकेतून व्यक्त झाला आहे.

 स्वातंत्र्योत्तर काळातील नागरी व्यवहारांची परवड चिकित्सा या चिंतनिकेत आचार्य गरुड यांनी केली आहे. या पुस्तिकेत वर उधृत केलेला सरनामा छापायला हवा होता कारण, तो या पुस्तिकेचा मूळ गाभा आहे. घटनेचा सरनामा हा तिचा आत्मस्वर असतो; तोच आपण हरवला आहे, याची प्रखर जाणीव ही पुस्तिका वाचताना होते.

 सन २००० मध्ये युतीचे शासन केंद्रस्थानी असताना घटनेच्या पुनरावलोकनाचा प्रयत्न झाला. तो पुरोगामी नागरिकांच्या निकराच्या विरोधामुळे निष्प्रभ झाला. आता त्याच तिडकीने सरनाम्यातील सहा मूलभूत तत्त्वांची पाठराखण, समर्थन, रुजवण करायची वेळ येऊन ठेपल्याची धोक्याची घंटा हे पुस्तक वाजवत आहे. ती ऐकून आपण जागे झालो, तर स्वातंत्र्याच्या शतकमहोत्सवी प्रवासापर्यंत आपण काही साध्य करू शकू. सावध ऐका पुढल्या हाका', असा जागर घडविणारी ही पुस्तिका अनिवार्य संदर्भग्रंथ म्हणून वाचायला हवी. स्वातंत्र्याच्या हीरकमहोत्सवी वाटचालीत या देशातला सामान्य नागरिक वाचिक अर्थाने राजकीय झाला. कायिक अर्थाने तो आत्ममग्नच राहिला. सामान्यांची आत्ममग्नता ही असामाजिक कृती ठरते. ज्या देशात असे नैराश्य रुजते, तिथे लोकशाही धोक्यात येते, हे आपल्या शेजारच्या देशांच्या सद्य:स्थितीवरूनही स्पष्ट होते. त्यापसून जर आपण बोध घेतला नाही, तर आपण करंटे ठरू, याची जाणीव देणारी ही चिंतनिका आपल्या नागरिकशास्त्राच्या आचारव्यवहारांची संहिता बनेल, तर चित्र बदलल्याशिवाय राहाणार नाही.
 ‘दोस्तो, अब मंच पर सुविधा नहीं है,
 आजकल नेपथ्य में संभावना है।
 सांगणारे पुस्तक प्रत्येक जागरूक व जबाबदार नागरिकाने गांभीर्याने वाचून राजकारण, निवडणूक यांत आळस झटकून सक्रिय व्हायला हवे.


• आमचा सरनामा : नियतीशी करार (वैचारिक)

  लेखक - आचार्य शांताराम गरुड
  प्रकाशक - लोकवाङ्मय गृह, मुंबई

  पृष्ठे ६७,  किंमत ४0 रु.

♦♦

वेचलेली फुले/१४0