पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/140

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

दिसून येते. तिच्यावर बोट ठेवून नागरिकांना स्वातंत्र्यपूर्व काळाप्रमाणे जागरूक व संघटितरित्या जबाबदार व जबाबदेई नागरिक बनवणे हाच हेतू आहे. या चिंतनिकेद्वारे आचार्य गरुड यांनी एका गंभीर नागरी आचारधर्माकडे सर्वांचे लक्ष वेधले आहे.

 ही चिंतनिका एका अर्थाने नागरिक व राज्यकर्त्यांच्या गेल्या ६० वर्षांच्या वर्तन व्यवहारांची निरीक्षण नोंद होय. ते म्हणतात की, कोणत्याही लोकसत्ताकाचा पाया हा लोकशाहीवर अवलंबून असतो. काँग्रेस पक्षाने त्यास ‘पक्षांतर्गत लोकशाही' ची कल्पना रूढ करून सुरुंग लावला आहे. पक्षीय लोकशाहीचा दुसरा अर्थ मर्यादित विचार व मर्यादित अभिव्यक्ती स्वातंत्र्य, असा होतो. हा एका अर्थाने लोकशाहीचा संकोचच होय. हा दोष दूर करण्यासाठी व्यापक लोकशिक्षण, लोकसंघटन, लोकजागृतीची गरज आहे. दुसरी गोष्ट अशी की, सामान्य माणूस व विशेषतः मध्यमवर्गीय, ज्यांच्याकडे समाज प्रगल्भ करण्याची जबाबदारी असते, तो वर्ग केवळ संसारी झाल्याने राजकारणापासून अलिप्त राहिला व परिणामी निवडणूक प्रक्रियेपासून दूर राहिला. मताधिकार' हे राजकीय शस्त्र, ‘मतदान' शब्द प्रचलित करून आपण ते नैतिक व दैविक बनवले. परिणामी, संसदीय कार्यपद्धती शिथिल झाली. कुत्र्याच्या छत्रीप्रमाणे रोज निर्माण होणा-या पक्ष संघटना, त्यांच्या अस्मितेच्या भ्रामक कल्पनांच्या दृढीकरणामुळे संसदीय कामकाजाचे गांभीर्य संपले. अर्थवादी व गुन्हेगारी पार्श्वभूमीचे लोकप्रतिनिधी निवडून आल्यानेही सरनाम्यातील मूळ उद्दिष्टांना हरताळ फासला गेल्याची खेदपूर्वक नोंद आचार्य गरुड करतात.

 स्वातंत्र्याच्या हीरक महोत्सवी वाटचालीत आपण विज्ञाननिष्ठा रुजवण्याऐवजी अध्यात्मवादी विचारपद्धती' चे परोक्ष समर्थन केल्याचे शल्य त्यांनी नोंदवले आहे. सामूहिक कृतीचा अभाव हे या अपयशाचे ते कारण मानतात. समूहातही व्यक्तिव्यवहार महत्त्वाचा असतो अशी त्यांची धारणा आहे. आम्ही' मध्ये ‘मीही महत्त्वाचा असतो, हे विसरून चालणार नाही. या विस्मरणामुळे आपला प्रवास ‘देवाच्या आळंदी' ऐवजी 'चोराच्या आळंदी' चा झाला. हे केवळ लोकशाही व स्वातंत्र्याचे ‘विडंबन'च नाही तर ‘विटंबन' ही होय, अशा प्रखर शब्दांत आचार्यांनी आपला नाकर्तेपणा अधोरेखित केला आहे. गेल्या १२ सार्वत्रिक निवडणुकांतून आपण काहीच धडा घेतला नाही. त्यामुळे आपण केवळ ‘नापास'च झालो नाही, तर 'नादार' ठरलो, हे त्यांनी ज्या उच्चरवाने घोषित केले, ते ऐकून तरी आपण जागे व्हायला हवे. सरनाम्याचे मंत्रसामर्थ्य जोवर आपल्या कानीकपाळी परिणाम करणार नाही तोवर आपला राजकीय व्यवहार सुधारणार नाही. त्यासाठी नव्या स्वातंत्र्ययुद्धाचाच पुकारा

वेचलेली फुले/१३९