Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/132

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

ताईबाई, कडकलक्ष्मीच त्यांच्या जगण्याच्या श्रद्धा, आधार बनले. मग त्यांची संस्कृतीच ठरून गेली.

 माणूस नावाच्या प्राण्याने त्यांना जेव्हा माणूस म्हणून नाकारले तेव्हा ते पण कुत्रा नि माणसात फरक करेनासे झाले. पैशाच्या मिजाशीवर शिकारीसाठी कुत्री पाळतात तशा स्त्रियाही ते पाळू लागले. त्यांचे सारे जीवन एक लोकव्यवहार असतो. लोकभाषा हेच त्यांचे संवाद साधन. अज्ञान, अंधश्रद्धा, रूढी, परंपरा हेच असतात त्यांच्या जगण्याचे आधार व भाग्योदय पण. त्यापुढे स्त्री असते अवहेलना, श्रम, अगतिकता, शोषण, अन्याय, अत्याचारासाठीची हक्काची बळी! तिला मन नसते. असते फक्त मांस. तिला मन नसतं, असतं फक्त मनगट, भाडखाऊ, ऐदी पुरुषाची मिरासदारी मुरवाय, जिरवायसाठी, तिला मन नसते. ती असते एक मादी, माता, माकडीण. हवे तेव्हा हवे तसे वापरायला नाचवायला मिळणारी. या स्त्रियांचे जीव मुठीत घेऊन जगणं असतं एक ‘गुदमर' कधीच न मोकळी वाट मिळणारे म्हणून मग विमल मोरे भेटतात तेव्हा त्या आपल्या दादल्याच्या परभारे सारे भडाभडा ओकतात. त्यांना परत ते बावन्याला कळण्याचे भय नसते म्हणून त्या सारे खरे सांगतात. हे जगणे मराठी साहित्यात वेदनेचे नवे वेद लिहीत असल्याचे जाणवते.

 सौंदर्याच्या तुमच्या संकल्पना हे पुस्तक बदलते. संस्कृतीची पारंपरिक परिमाणं धडाधड कोसळण्यास भाग पाडणारे. हे लेखन नव्या समाज उभारणीची आवश्यकता रेखांकित करते. असे भिडणारे लिहिणे भिडल्याशिवाय शक्य होत नसतं. या लेखनाची जातकुळी ‘जावे त्याच्या वंशाची आहे. हे हृदयीचे ते हृदयी घातले' असा बाज झालेले हे लेखन परदुःख सहिष्णू झाल्याखेरीज घडत नसते. विमल मोरे यांनी हे लिहिण्यात मोठे धाडस दाखवले.

 पुरुषसत्ताक व्यवस्थेविरुद्धच्या शोषित मूक स्त्रियांचा सामूहिक जिहाद आहे. हे पुस्तक स्त्रीचे मडे, भूत होऊ नये म्हणून नागवणाच्या पुरुषी अहंकारावर चोळलेले मीठ अशासाठी की ही जिव्हारी, हे जहर केव्हातरी पुरुषी गळी उतरायलाच हवे. या पुस्तकाचे सामाजिक, साहित्यिक मूल्य परंपरेने पारंगत झालेल्या निकषांवर जोखणे अशक्य आहे. हे पुस्तक समजून घेणे महत्त्वाचं. वाचून ते सोडून देता येत नाही. ते तुमचा पिच्छा पुरवते. तुम्हास प्रश्नांकित करते. प्रश्नांचा तुमच्या मागे ससेमिरा लावते. हे असतं या लेखनाचे यश. ते तुम्हास नव्या जगात नेते.

 भटक्या जमातीत बाईचं जगणं कठीण, पण मरणे त्या परीस कठीण. मेल्यावरही तिला तिच्या सत्पणाची परीक्षा द्यावी लागते. जाळल्यावर राख

वेचलेली फुले/१३१