पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/124

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 लेखक वर्तमानास सत्य, शिक्षणास समज, समृद्धीस प्रतिष्ठा समजणारा, प्रतिष्ठेची झूल आहे त्याची अडचण, आईला आपले अडाणीपण नेहमी प्यारे. स्वातंत्र्योत्तर काळात डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले, छत्रपती शाहू महाराजांसारख्या समाजसुधारकांमुळे ज्यांच्या घरात ज्ञानाचा दिवा लागतो ती घरे शिक्षण, समृद्धी, प्रतिष्ठेने उजळून निघाली. अशा घरातील आई मात्र गाभा-यातल्या नंदादीपाप्रमाणे ‘जुने ते सोने' म्हणत मातृत्वाची ऊब जपत राहिली. आई समजून घेताना हा नुसता आईचा शोध न राहता ती समाजसंक्रमणातून येणारी दोन पिढ्यांची आपापल्या समजुतीवर असलेल्या श्रद्धा नि संस्कारांची संघर्ष कथा होते.

 आई समजून घेणे हे एक सामाजिक उत्खनन असते. त्यात तुमच्या हाती येतात गतकालाचे आयुष्य उसवणारे अवशेष. ते सारे जुन्या जखमांचे नवे संदर्भ असतात. उजेडवाट शोधण्याच्या मनीषेने जे वाट चालतात त्यांना अंधाराची सावली सोडता येत नाही. आईच्या गळलेल्या केसा-गुंत्यातून जिभेवर विरघळणारी ‘बुढ़ी के बाल' मिठाई अजून मिळावी म्हणून आईचे केस अधिक गळण्याची अपेक्षा करणारा मुलगा हा नव्या व्यवस्थेचा एक स्वार्थी गुलाम म्हणूनच जन्मतो. ती नवव्यवस्थेची एक अस्वस्थ नि अटळ निर्मिती असते. नातवाला कोंबडी दाखवण्यासाठी तासन्तास उभारणारी आजी झालेली आई बाप झालेल्या लेखकाला पेलत नाही. कारण आईपण पेलणे नि प्रतिष्ठेच्या बुरख्याचा तोरा सांभाळणे या मुळातच दोन वेगळ्या खाणी आहेत. हे सदरचे पुस्तक समजावते. दु:खाचे पुनर्भरण समृद्धी करू शकत नाही. त्यासाठी माणूसपण जपण्याची अटळ शर्त असते. हे समजावणारे पुस्तक अस्वस्थ शतकाची पावती होय.

 ज्यांना कुणाला स्वतंत्र भारताच्या हीरकमहोत्सवी सामाजिक संक्रमण समजून घ्यायचे आहे अशांना ‘आई समजून घेताना' पुस्तक मार्गदर्शकाचे काम करील. आई एक महाकोडे आहे. ती शेवट नसलेली एक रहस्यकथा आहे. हे पुस्तक ‘आहे रे' आणि 'नाही रे' वर्गाच्या जगण्याची संघर्ष कथा जशी आहे तशी ती विवेक जागवणारी चेतना कधीही भूतकाळ राक्षसी नखांसारखा क्रूर असतो. ज्यांना वर्तमान माणसाळता येतो तेच आईचा भूतकाळ पचवू शकतात. आई पचवणे नि पेलणे यासाठी शहाणपण नामक समाजशिक्षण आवश्यक असते. हे या पुस्तकाकडे प्रकर्षाने उमगते. अंगाई गाणारी आई मुलाच्या कानात उद्याची युद्धगाणी रुजवत असते. म्हणून ती माता धिराई. आई जशी असेल तशी तिला स्वीकारणं म्हणजे तिला सन्मानित करणे. ज्यांना आपल्या आईच्या

वेचलेली फुले/१२३