आई समजून घेताना : आईचा संवेदी शोध
उत्तम कांबळे यांचे ‘आई समजून घेताना' ही एका आईच्या शोधाची चित्रकथा आहे. म्हटले तर ते आईचे दीर्घ शब्दचित्र, व्यक्तिचित्र, रेखाचित्र
आहे. आईच्या जगण्याची संघर्ष कथा आहे. आईपुढे शरणागत झालेल्या मुलाने घेतलेला हा शोध असल्याने त्याला वेगळे परिमाण लाभले आहे. मॅक्झिम गाँकी, साने गुरुजी, कवी यशवंत, नारायण सुर्वे यांच्या माळेत आता उत्तम कांबळे यांचे नाव घ्यावे लागेल.
गावकुसाबाहेरचे हलाखीचे जीवन लाभलेले एक दलित कुटुंब. त्या कुटुंबातील इलिंदा एका दलिताची पत्नी होते. पती मिलिटरीत जातो. इकडे इलिंदा मुलांना सांभाळत आयुष्याचा गाडा ओढत राहते. पती व्यसनी होतो. कुटुंबाची आबाळ होते. कुंकू पुसले जाते. पण इलिंदा हिंमत उसवू देत नाही. मजुरी, चाकरी, चोरी, करून पोटच्या पाच पोरांना उजवत, जोजवत राहते. जगण्याची ज्यांच्यात जिद्द असते ती माणसे अंधारास हरवून सूर्यावरही मांड ठोकतात. दगड, प्राण्यांची नावे माणसास ठेवणाच्या समाज व्यवस्थेचं भान उत्तमला येते नि तो समाजाबरोबर आईचाही शोध घेतो.
या साऱ्या पुस्तकातून उत्तम कांबळे यांची समजून येणारी आई ती नुसती उत्तम कांबळेची राहात नाही. ती दलित, वंचित वर्गातून शिकून सवरून प्रतिष्ठित झालेल्या शहाण्यासुरत्या नव्या पिढीची इतिहासास कवटाळून आयुष्य कंठणारी एक प्रातिनिधिक आई होते. ती समजून घेताना जर्मन नाटककार बर्टोल्ट ब्रेख्तची ‘मदर करेज', 'द गुड वुमन' सतत आठवत राहते.
लेखकाची आई एक लढणारी, करारी, स्वाभिमानी आई आहे. लेखक आपल्या आईची एक स्मरण साखळी आपल्यापुढे उभी करतो. ही आई बिरबलाच्या कथेतील पिल्लाच्या जीवावर उठणारी नाही. उलटपक्षी मुलासाठी जीव गहाण ठेवायला तत्पर असलेली. उत्तम कांबळे यांनी आपली आई इतिहास नि वर्तमान, शिक्षण नि अज्ञान, गरिबी आणि समृद्धी, सुशिक्षित नि समजदार यांच्या विलक्षण द्वंद्वातून उभी केली आहे. आईचा इतिहास गरिबी, अज्ञान, अंधश्रद्धा यांनी भरलेला असला तरी त्याला समंजसपणाची मऊ झालर आहे.