गेली. मुलाखत हा एक आणखी, आगळा, नजराणा. मराठी नाट्य व चित्रपटसृष्टीतील अभिनेते निळू फुले यांची प्राचार्य डॉ.जी.पी.माळी यांनी घेतलेली मुलाखत म्हणजे निळू फुलेंच्या समग्र जीवनाचा व्यासंगपूर्ण घेतलेला आढावा ही मुलाखत निळू फुलेंच्या अनेक अस्पर्शित पैलूंवर प्रकाश टाकते. डॉ. आ. ह. साळुंखेचे विद्रोही तुकाराम वाचल्यानंतरचे अस्वस्थपण मुलाखतकाराने योग्य शब्दांत पकडून ही आकाशवेल नव्या सामाजिक अवकाशात पोहोचवली आहे. मुलाखतीतील प्रश्न चपखल असून ते निळू फुलेंच्या अनेक अपरिचित बाबी वाचकांपुढे आणतात.
लोकसाहित्यातील ‘लावणी' व 'गोंधळ'वरील भाषणे डॉ. माळींच्या अभ्यासपूर्ण विवेचनाचा सुंदर नमुना म्हणून सांगता येईल. डॉ. माळी हे मराठीचे विचारशील प्राध्यापक होते. 'स्वामी' कार रणजित देसाई हा त्यांच्या संशोधनाचा व आस्थेचा विषय आहे. त्यांच्यावर यात भाषण नसणे शक्यच नव्हते. रणजित देसाईंवर साहित्य प्रभावासंबंधीचे भाषण 'स्वामी' कादंबरीवरील भाषणापेक्षा अधिक उजवे सिद्ध झालेय. 'आकाशवेल'मध्ये प्राचार्य डॉ. माळींनी ‘वक्तृत्व एक कला' विषयावरील भाषण संग्रहित करून या भाषण संग्रहास सिद्धांत व व्यवहाराची एकसाथ जोड दिली आहे.
प्राचार्य डॉ. जी. पी. माळी यांनी लिहिलेल्या सोबती' आणि 'रणजित देसाई जीवन आणि साहित्य या ग्रंथानंतर प्रकाशित झालेला ‘आकाशवेल' हा भाषण संग्रह मराठी साहित्य अभ्यासक वक्तृत्व कलेचे उपासक व सामान्य वाचक या तिघांनाही समानपणे संदर्भ ग्रंथ म्हणून उपयुक्त होईल. डॉ. माळींचे आजवरचे लिखाण मी वाचत आलो आहे. ते ब-याचदा माहितीच्या अंगांनी जात असते ते विश्लेषणात्मक होईल तर हे ग्रंथ मराठी शारदेच्या दरबारातील अनमोल नजराणे ठरतील. त्याचे लेखन प्रयत्नपूर्वक गंभीरतेने लिहिले जात असल्याने त्यांचे संदर्भमूल्य नेहमीच उच्च प्रतीचे राहिले आहे. “आकाशवेल'ने आपल्या कवेत घेतलेले ‘शब्दाकाश' त्याची भलावण केवळ ‘आकाशित शब्द' म्हणून करून चालणार नाही. माझ्या मते, “आकाशवेल'चे सामाजिक व साहित्यिक मूल्य आकाशातीत, अवकाश पेलणारे, नवे क्षितिज कवेत घेणार आणि म्हणून विचारणीय ठरते.
लेखक - प्राचार्य डॉ. जी. पी. माळी
प्रकाशक - स्नेहवर्धन पब्लिशिंग हाउस,
८६३, सदाशिव पेठ, पुणे - ४११०३0
प्रकाशन : २६ जानेवारी २००५
♦♦