पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/116

विकिस्रोत कडून
Jump to navigation Jump to search
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

 द्यायची जबाबदारी ही शिक्षण, परीक्षा व्यवस्थेची असायला हवी. त्यासाठी आधीच दुर्बल असलेल्यास खेटे घालण्याची नामुष्की येऊ नये. अन्य मुलांबरोबर न्याय्य स्पर्धा करण्याचा, अधिक नि व्यक्ती गरजेनुसार विशेष सोयी सुविधा मिळण्याचा अपंग विद्यार्थ्यास हक्क आहे नि त्याची सन्मानजनक पूर्तता करणं हे संबंधित यंत्रणेचे कर्तव्य म्हणून नोंद व्हायची वेळ येऊन ठेपली आहे. भालचंद्र करमरकरांना आपली अपंग मुलगी शिकवती ठेवण्यासाठी शाळा, विद्यापीठ इत्यादीच्या प्रशासन, परीक्षा अधिका-यांच्या ज्या नाकदच्या काढाव्या लागल्या ते वाचताना हे ठळकपणे रेखांकित होते.

 सामान्य विद्यार्थी एका दिवशी दोन प्रश्नपत्रिका सोडवू शकतो. अंध, अपंग, मतिमंद (नि गतिमंदही!) विद्याथ्र्यांना ते अशक्य असतं. परीक्षेचं वेळापत्रक ठरविणाच्या शाळा, बोर्ड, विद्यापीठ यांनी याचं भान ठेवलं पाहिजे. असे विद्यार्थी शाळा, महाविद्यालये, विद्यापीठे येथे प्रवेश घेतात तेथील इमारती अपंग सुलभ (उतार, पाय-यातील अंतर, संरक्षक व आधार कठडे, प्रसाधन कक्ष वर्ग इ.) असल्या पाहिजेत. त्या ‘सार्वजनिक संस्था' या सदरात मोडत असल्याने अशा इमारतींना परवाने देताना आग्रही राहिले पाहिजे. जुन्या इमारतीतही या सुविधा करणे अनिवार्य केले पाहिजे, कारण अपंग विद्यार्थ्यांची संख्या विकसित (शायनिंग?) भारतात वाढती आहे. समाजात अनेक अंध, अपंग, मतिमंद, गतिमंद विद्यार्थी पूर्ण पुनर्वसनाचा हक्कदार आहे. त्याला लैंगिक सुख मिळाले पाहिजे. ती त्यांची इतरांप्रमाणेच मूलभूत गरज असते. अपंग मुला-मुलींतही पितृत्व, मातृत्वाची ओढ असते. अशा मुलांना अपत्य जबाबदारी पेलण्यापर्यंत सक्षम करण्याची जबाबदारी पालक, संस्था, शासन, समाजाची आहे याचे भान ठेवण्याची वेळ येऊन ठेपली आहे. 'रोगापेक्षा इलाज भयंकर', 'न्यायाने अपंग, मतिमंद मुला-मुलींची नसबंदी, गर्भाशय काढणे यासारखे अमानुष उपाय योजले जातात. कारण आपला समाज या प्रश्नासंदर्भात व्हावा तितका भावसाक्षर झालेला नाही. सर्वांना अनिवार्य लैंगिक शिक्षणाचा वस्तुपाठ अंगिकारायची वेळ आली आहे. मध्यंतरी शिरूर येथील शासकीय मतिमंद मुलींच्या वसतिगृहातील एक मुलगी गर्भवती झाली म्हणून उर्वरित सर्व मुलींची गर्भाशये काढल्याचे निदर्शनास आल्यावरून मोठा गहजब झाला होता, तो योग्यच होता. या पुस्तकातही वल्लरीच्या वाट्यास तीच शिक्षा आल्याचे वाचून अजून अपंगांच्या संदर्भातील अज्ञानाच्या अंधाराचे जाळे फिटले नसल्याचे प्रकर्षाने लक्षात आले.

 समाजातील अपंगांच्या शिक्षण, संगोपन, पुनर्वसन क्षेत्रात अंधाराचे जाळे फिटायचे तर हे पुस्तक समाज शिक्षणाचा भाग म्हणून वाचले गेले पाहिजे.

वेचलेली फुले/११५