'फिटे अंधाराचे जाळे : बहुविकलांग अपत्य वाढविण्याची कथा
'फिटे अंधाराचे जाळे' पुस्तकाचे लेखक आहेत भालचंद्र करमरकर. लग्न उशिरा झालेले. अपत्य उशिरा. जे अपत्य पोटी आले ते पक्षाघाताचा बळी. बहुविकलांग. पालक म्हणून भालचंद्र करमरकर व त्यांच्या पत्नी विद्याताई यांच्यावर आकाश कोसळल्यासारखी स्थिती. ते जिद्द हरत नाहीत. आपल्या पोटी आलेल्या वल्लरीचा सांभाळ करायचा व तिला सर्वसाधारण मुलामुलींसारखे करायचे (नॉर्मल) हा ध्यास. दुसरे मूल होऊ द्यायचे नाही असा शहाणपणाचा निर्णय ते घेतात. वैद्यकीय उपचारच प्रमाण मानतात. देवाचे अंगारे-धुपारे न करता विज्ञान व वैद्यकशास्त्राची कास धरतात. वल्लरी हे त्यांच्या कुटुंबाचे एकमात्र लक्ष्य ठरते. ‘फिटे अंधाराचे जाळे' म्हणजे पदरी आलेल्या बहुविकलांग सुकन्येस सज्ञान, सुजाण, सुशिक्षित करतानाच्या अनंत अनुभवांची प्रांजळ मांडणी. वल्लरी नुकतीच संस्कृत विषयात एम. ए. झाली. सतत ‘रायटर' घेऊन शिकलेली वल्लरी आता स्वहस्ते सी. डी. राईट करू शकते, संगणक हाताळते. प्रिंट काढते, लुनावर बसते (अर्थात बाबांच्या मागे) बोलते (सभेतही!) शिकवते (वर्गात) अन् आता तर चक्क लिहितेही!
हे पुस्तक माणूसपण शिकवणारे पुस्तक होय. ज्यांच्या पोटी अंध, अपंग, मतिमंद अपत्य आले असेल त्यांना हे पुस्तक उमेद देते. अंधार झालाय खरा, पण सूर्य उजाडू शकतो असा आशावाद जागवणारे हे पुस्तक आहे. हे पुस्तक वाचकांच्या मनात अनेक सामाजिक प्रश्नांचे मोहोळ निर्माण करतं. हे पुस्तक आहे आत्मपरीक्षण करण्याचे. बहुविकलांग वल्लरी, एक मांसाचा गोळा होता. भालचंद्र पंत, विद्याताई व वल्लरीची आत्या या ‘गुरुत्रयी'नी या मांसाच्या गोळ्याला आकार देऊन एक बुद्धिमान, सुजाण, सुकन्या बनवले. ते असताना सर्वसामान्य माणसास या कुटुंबाच्या शर्थीचा अचंबा वाटू लागतो व आपल्या किडी-मुंगी सारख्या आयुष्याची खरे तर शरमही दाटून येते.
हे पुस्तक अनेक सामाजिक हक्क व कर्तव्याचे द्वंद्व निर्माण करते. ज्या मुलांना अपंगत्व आलेले असते त्यांना लेखनिक घेऊन परीक्षा देता येते. विद्यार्थी/परीक्षार्थी एकदा अपंग म्हणून नोंदला गेला की, त्याला लेखनिक