Jump to content

पान:वेचलेली फुले (Vechaleli Fule).pdf/114

विकिस्रोत कडून
या पानाचे मुद्रितशोधन झालेले आहे

पुस्तक अवश्य वाचायला हवे. विशेषतः शिक्षक व पालकांनी तर हे पुस्तक आधुनिक काळातील ‘आचारशुद्धी ग्रंथ' म्हणून केवळ वाचून चालणार नाही तर घरोघरी, शाळाशाळांतून पारायणाच्या पद्धतीने याचे निरंतर वाचन, चिंतन, मनन व्हायला हवे तरच उद्याचा भारत अंधश्रद्धामुक्त डोळस, विज्ञाननिष्ठा, चिकित्सक, स्वप्रज्ञ बनेल.

 आपल्या सध्याच्या शिक्षणात विषयांची गर्दी झाली आहे. या गर्दीत जगण्याचा मार्गच हरवल्यासारखी स्थिती आहे. जगण्यास उपयुक्त विषयाचे शिक्षण असायला हवे. त्यासाठी शिकणे व शिकवणे या दोन्हींची नवी मांडणी, नवा आकृतीबंध आवश्यकच नाही तर अनिवार्य झाला आहे. स्वातंत्र्य, समता, बंधुता व लोकशाहीसारखी मूल्ये विज्ञाननिष्ठतेच्या मूल्यांशिवाय दृढ होऊ शकत नाहीत हे समजून घेतले पाहिजे. भारत हा जगाच्या पाश्र्वभूमीवर अंधश्रद्धा, रूढीबद्ध, पारंपरिक, दैवी विचारधारेवर विश्वास असलेल्या बहुसंख्याकांचा देश आहे. येथील समाज एकविसाव्या शतकातील वैज्ञानिक विश्व समाजाबरोबर नेऊन पोहोचवायचा असेल तर ‘ठरलं...डोळस व्हायचं सारखी पुस्तके पाठ्यक्रमांच्या प्रमुख उद्देशात अंधश्रद्धा निर्मूलन' अग्रक्रमाने असायला हवा याचे भान देणारा हा ग्रंथ म्हणूनच मला वैज्ञानिक, शैक्षणिक, सामाजिक सर्व दृष्टीने महत्त्वाचा वाटतो.

 या पुस्तकाचे एक बलस्थान आहे. हे पुस्तक कुणाच्या धार्मिक भावनांवर आघात करण्यासाठी हेतुतः केलेले लिखाण नव्हे. काही मतलबी मंडळी लोकांच्या धर्मभावनेवर आरूढ होऊन समाजात अपसमज, गैरसमज पसरविण्याचे पद्धतशीर प्रयत्न करत असतात. अशांमध्येही विवेक जागवण्याची विलक्षण शक्ती या लिखाणात आहे. घड्याळाचे काटे उलटे फिरवाल तर तुम्ही मध्ययुगामार्गे अश्मकालीन व्हाल. ते सुलटे फिरवाल तर तुम्ही भविष्यवेधीशास्त्राने (फलित ज्योतिष नव्हे) अवकाशही कवेत घेऊन प्रतिसृष्टी निर्माण कराल. तुम्ही ठरवायचे आहे काटे उलटे फिरवायचे की सुलटे! मग ठरले ना? डोळस व्हायचंच! त्यासाठी हे पुस्तक वाचायचेच!


• ठरलं...डोळस व्हायचंच (अनुभव)

 लेखक - डॉ. नरेंद्र दाभोलकर,
 प्रकाशन - छाया प्रकाशन, सदर बझार, सातारा-१

 पृष्ठे - १०७  किंमत - ५0 रु.

♦♦

वेचलेली फुले/११३